मंगळवार, २ जुलै, २०१९

सोनगिरी ट्रेक


               ट्रेक म्हणजे ट्रेकर्स च्या आयुष्यात एक वेगळाच अविभाज्य भाग असतो, तो त्याला नवी विचारधारा घेऊन जगायला प्रेरित करतो आणि प्रत्येक ट्रेकर्स च्या व्याख्या ह्या त्याच्याप्रमाणे भावनीक असतात, त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून ट्रेकर्सची ची व्याख्या शब्दात मांडणे कठीण होईल आणि प्रयत्न जरी केला तरी शब्द अपुरे पडतील...                ३० जून ला माझं मुळात नाशिक येथे 'हरिहर' ला जाण्याचे ठरलेले, पण काही कारणात्सव तेथे रद्द करावे लागले आणि रोशन सोनगिरी ट्रेक संदर्भात, गेल्या एक आठवड्यापासून माझ्या संपर्कात होता. अगदी सर्वकाही तयारी असूनही शेवटच्या क्षणी हरिहर साठी रद्द झाले, म्हणूनच मी या सोनगिरी ला येऊ शकलो, ह्यात काही शंका नाही. 

 

               ठरल्याप्रमाणे सर्व योग्य वेळेवर कर्जत ला पोहोचले. रोशन बरोबर माझे पहिलेच ट्रेक होते, त्यामुळे तो समोर असलेल्या व्यक्तींशी ओळख करून देत होता. असे होत होताच थोड्याच वेळात जयेशने ने सर्वांना  चहासाठी विचारले आणि चहा म्हणजे माझ्यासाठी ट्रेक च्या अगोदरचं पहिले समाधान. थोड्याच वेळात सर्वांचे चहापान झाल्यावर आम्ही सर्व सोनगिरी गडाच्या पायथ्याशी रवाना झालो. गाडीतून उतरताच काही मिनिटांनी वरूण राजाने हजेरी लावली आणि सर्वांचे स्वागत केले. मनामध्ये लगेच एक आठवण ताजी झाली. १६ जून च्या रविवारी मी 'कळसुबाई ट्रेक' करून पायथ्याशी परतल्यावर पाऊस आलेला. तेव्हा यशस्वी ट्रेक पूर्ण झाल्यावर बक्षीस म्हणून आणि आत्ता ट्रेकिंग ला सुरुवात म्हणून पावसाचं आमच्यासाठीचं स्वागत म्हणून येणं, हे मनाला एक वेगळाच आनंद देत होते. व्यक्ती मोजणी साठी वर्तुळाकार रिंगण करून मयूर दादाने माहिती दिल्यावर आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. पावसामध्ये गड चढण्याचा आनंदच वेगळा होता. मयूर दादा आणि जयेश आयोजक असल्यामुळे वाटा अगदी सहज सापडत होत्या. काहीच वेळात मोकळी निसर्गरम्य जागा मिळाल्यामुळे तेथे फोटोसेशन चालू केलेले व एक आवड म्हणून मामांनी एका वाहत्या पाण्यात छोटासा धरण बांधलेला. थोड्याच वेळात असे समजण्यात आले कि अजून पुढे वर गेल्यावर प्रशस्त अशी मोकळी जागा आहे, त्यामुळे आम्ही तेथून निघालो. ठरल्याप्रमाणे पुढे आल्यावर फोटोसेशन परत चालू केले, पण जयेश, मयूर व ३-४ इतर सहकारी बांधव ब्रेकफास्ट म्हणून चायनीज भेळ बनवण्यासाठी गेले. ब्रेकफास्ट आणि फोटोसेशन आटपल्यावर पुढील ट्रेकसाठी पुन्हा सर्वजण सज्ज झाले. मित्रभाऊ रोशन सोबतच होता, शिवाय अन्य मित्र ही सोबत होते. रोशन मला अगदी सुरवातीपासून त्याला माहित असल्याप्रमाणे झाडांची माहिती देत होता. शेखर... हे बघ ह्याची अशी भाजी करतात. त्याची तशी भाजी करतात वैगरे...वैगरे... पायवाटांच्या बाजूलाच मश्रुमही दिसत होते. 'करटावले' म्हणून एक फळ येते ते मला रोशन च्या सांगण्यावरून माहित झाले.. ते शोधण्यात रोशन ट्रेक चालू असताना मध्येच व्यस्त झालेला आणि वरून सांगत पण होता कि हे तुला सहज दिसणार नाहीत, वेलींच्या खाली दिसतील. अशी मज्जा आणि निसर्गाचा आस्वाद असताना फार मोठा आनंद वाटत होता. गडाच्या माथ्याशी पोहोचतेवेळी मध्येच २ पॅच खडतर होते. पण ते आयोजक, तसेच चंदू आणि जीत व इतर सहकारी यांच्या मदतीमुळे सर्वांना सहज शक्य झाले. वाटेतच मुंग्याचे वारुळही दिसत होते, मयूर दादाने सांगितले मुंग्यांच्या वारूळाचा आकार ज्या ठिकाणी निमुळता असेल ती म्हणजे पूर्व दिशा. हे मला त्याच्या सांगण्यावरून कळले. सर्वात शेवटचा म्हणजेच तिसरा पॅच हा खडतरच होता, पण कातळ असल्यामुळे फारसे जाणवले नाही. फायनली गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर मंद वारा, रिमझीम येणारा पाऊस व धुके हे म्हणजे फार एक जबरदस्त आल्हाददायक होते. तिथेही फोटोसेशन व नंतर स्वप्नील ने शिववंदना दिली व आम्ही परतीच्या प्रवासास सुरुवात करताच बाहेरील अन्य दोनशे ट्रेकर्सचा समूह सुद्धा तेथे आलेला, तिथे एकच पायवाट असल्यामुळे अव्यवस्था निर्माण झालेली, तरी सुद्धा आम्ही आळीपाळीने मार्गस्थ होत होतो. उतरताना मातीच्या २ खडतर पॅचची रिस्क होतीच. पण जयेश, चंदू, मयूर, जीत, स्वप्नील व रोशन यांच्यामुळे तसेच इतर सहकार्यांमुळे वाट उतरणे अगदी सहज सोप्पे झाले. आठवणींचे जतन व्हावे म्हणून चंदुदादाने स्नॅप्स शुट करणे चालूच ठेवलेले. पुढे ज्याठिकाणी आम्ही ब्रेकफास्ट ला थांबलेलो त्याच ठिकाणी दुपारच्या जेवणाची सोय होती. अगदी पुरेपूर आणि मस्त जेवण झाले. निसर्गाच्या सानिध्यात होणारे जेवण म्हणजे मनाला सुख:द धक्का देणारा आनंद होता. हे सर्व झाल्यावर पुन्हा उतरण्यास सुरुवात केली.  उतरण्याच्या वेळेस फटाफट येत होतो, पण त्यात एका ठिकाणी रस्ता चुकला आणि वेळीच डिंपल वहिनींच्या लक्षात आले. परत थोड्याच वेळात लक्षात आले कि दुसऱ्या वाटेने निघायचे आहे, जो रेल्वे ट्रेकवर नेत होता. रेल्वे ट्रेक वर पोहोचताच थोडासा आराम केला कारण सर्वजण जमा होणे बाकी होते. 


                सर्वजण जमल्यावर गाड्या जिथे येणार होत्या तिथे परत मार्गस्थ होण्याची सुरुवात केली. वाटेतच एक छोटा अजगर अर्धमृत अवस्थेत सापडलेला, बहुतेक अगोदर त्याला कोणी मारण्याचा प्रयत्न केला असावा, पण काही कथा वाचून आहे, त्यामुळे त्याच्या जवळ जास्त जाण्याचा मी काही प्रयत्न केला नाही. पुढे गाड्या आल्यावर आम्ही सर्वजण तेथून निघताच मामा व एक मित्र तेथून निघून जाणार असे कळल्यावर त्यांना निरोप देऊन आम्ही सर्वांनी परतीच्या प्रवासास सुरुवात केली. निघाल्यावर रोशन गाडीमध्ये बाजूलाच होता त्यामुळे रात्री च्या जेवणासाठी आग्रह करत होता. घाटकोपर ला फ्रेश हो जेवून घे आणि मग आरामात मालाड ला निघ. असे बोलत होता. पण त्याला बोललो आत्ता नको नंतर निवांत येयीन तुझ्याकडे..
              
               अशाप्रकारे सोनगिरी ट्रेक हा खूप मस्त एक्सप्लोर केला. त्यात नवीन मित्रमंडळींशी ओळख झाली. सर्वांनी फार चांगल्या प्रकारे सुयोजन केले. सर्वांचीच नावे घेत राहिलो तर पुन्हा परत एकदा लिस्ट बनेल. व सर्वांचे आभार मानले तर योग्य राहणार नाही, कारण आभार मानून नुकतेच नवनवीन झालेल्या मित्रमंडळींना परके केल्यासारखे वाटेल. म्हणून आभार न मानता तुर्तास थांबतो, व पुढच्या ट्रेकला नक्कीच भेटू!


--/ चंद्रशेखर सावंत

शनिवार, २३ मार्च, २०१९

स्वराज्य निर्माता


                 छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रामधीलच नाही तर संपूर्ण भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक दैवी चमत्कारच होता. त्यांची आई जिजाबाई हि रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावातील. लखुजी जाधवराव या निजामशाहीतील शूर सरदाराची मुलगी तर वडील शहाजीराजे भोसले हे स्वकर्तुत्वाने सामर्थवान बनलेल्या मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव राजकारणात मुरलेल्या व स्वातंत्र्याची जिद्द बाळगणाऱ्या माता -पित्याच्या पोटी शिवाजीचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या वर्षी वैशाख शुद्ध द्वितीयेस जुन्नर जवळ शिवनेरी या किल्ल्यावर झाला. (तिथीप्रमाणे शिवजयंतीची तारीख बदलत असते.) शिवबाच्या जन्माने साडेतीनशे वर्षांच्या काळ्याकुट्ट अशा मोगल, आदिलशहा, सिद्दी यांच्या जुलूमी राजवटीचा अस्त झाला. जिजाऊ ही शिवबाजी केवळ जन्मदात्री नव्हती तर त्यांची ती स्फूर्ती, प्रेरणा, मार्गदर्शिका व मायेची सावली होती. जिजाऊंचे पुत्रप्रेम अजोड होते, तर शिवरायांची मातृभक्ती अपरंपार होती. पराक्रमी व कर्तृत्वान अशा आदर्श मातेचे छत्र शिवरायांना लाभलं. शिवबाच्या मातृभक्तीचं प्रत्यय यावं यासाठी एका प्रसंगाची आठवण करुन देणं आवश्यक वाटते. एके दिवशी शहाजीराजे शिवबासह विजापूरच्या आदिलशहांना भेटण्यासाठी गेले होते. शहाजींनी बादशाहाला मुजरा केला. शिवबा मात्र ताठ मानेनं बादशहांना न्याहाळीत होता. शहाजी शिवबांजवळ गेले आणि बादशाहाला मुजरा करण्यास सांगितले. परंतु शिवबा नि:स्तब्ध होते. जिजाउंची शिवबाला शिकवण होती की, प्रणाम करायचा तो फक्त माता-पिता व परमेश्वराला. हीच शिकवण आत्मसात करुन शिवबांनी सुलतानाला मुजरा करण्यास नकार दिला. खरं तर शहाजीराजेंची अवज्ञा करण्याचा शिवबाचा हेतू नव्हता. योग्य नसलेल्या माणसाला मुजरा नाकारला, यात शिवबाचं काय चुकलं, असा प्रतिसवाल जिजाऊंनी शहाजीराजेंना या घटनेवर चर्चेदरम्यान केला. आईसारखे परमदैवत दुसरं नाही, हे शिवबाच्या मातृभक्तीने सिद्ध केलं.
                  स्वदेश स्वतंत्र व्हावा हि माता-पित्याची ईच्छा शिवाजी महाराजांनी पूर्ण केली. हिंदू धर्माचा नाईनाट करून सर्व हिंदुस्थान मुघल साम्राज्य करून टाकावा या आकांशेने झपाटलेला औरंगजेब बादशाह हा दिल्लीच्या तख्तावर होता.विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही. तो दिल्लीवरून सतत त्यांना पैसा व सैन्य पाठवत होता. माता जिजाऊ आणि शिवाजी राजे यांच्या मनात या अन्यायकारी वृत्तींचा विरोध आणि चीड निर्माण करून स्वातंत्र्य आणि स्वराज्य या विषयीच्या निष्ठा निर्माण केल्या. शिवाजी राज्यांच्या गुणांचा विकास केला आणि हळूहळू शिवाजी राजे प्रयत्न करू लागले. मराठी माणसाच्या मनातील रागाला नेमकी दिशा दाखविण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा’  हे सूत्रे धरून स्वातंत्र्य प्रेमी, व पराक्रमी, माणसांना एकत्रित केले. औरंगजेब हा जबरजस्त लष्करी सामर्थ्याचा पराक्रमी, कट्टर मुस्लीम व दक्षिणेतील राजकारणी माहिती असलेला बादशहा होता. पण शिवाजीने अफझलखाना सारख्या पराक्रमी मुसलमान सरदाराला जिवंत असे पर्यंत महाराष्ट्रात येण्याची त्याची हिम्मत झाली नाही. औरंगजेबाने शिवाजीरायांना पकडून आग्रा येथे ठेवले. पण तेथुही ते चातुर्याने निसटले. तेव्हा औरंगजेबाने धसकाच घेतला.
शिवबाला युद्धतंत्रांचे शिक्षण देण्यासाठी जिजाऊंनी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. तलवार चालविणे, तिरंदाजी करणं, लढाईचे आराखडे तयार करणे, मैदानावरील तसेच डोंगरी मुलूखावरील लढाई कशी करायची याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं. जिजाऊंनी शिवबाला रामायण-महाभारताच्या कथांच्या माध्यमातून रामाचा पराक्रम, भीमार्जुनाचे युद्धकौशल्य, युधिष्ठीरची धर्मनिष्ठा, पृथ्वीवरील दुष्टांचा संहार करण्यासाठी श्रीकृष्णाने वापरलेली कुटील-नितीची शिकवण दिली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे छत्रपतींना हिंदवी स्वराज्याचा राजा बनवायचा. शिवबाला छत्रपती बनविण्यासाठी जिजाऊंनी प्राणपणालालावले.
             शिवाजी महाराजांना लढाईचे राज्य कारभाराचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांनी दिले. दहा-बारा वर्षाचा असतानाच शिवाजींच्या मनात स्वातंत्र्याचे वारे खेळू लागले. माझा देश मोगलांच्या आणि मुसलमानांच्या गुलामीतून मुक्त करायचा. माझ्या बांधवांना गुलामीतून व छळातून मुक्त करायचेच! हाच उद्देश ठेवून त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकून सवंगडी जमा केले. तानाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी, येसाजी आणि एकांपेक्षा ऐक जिवाला जीव देणारे मित्र गोळा केले.  एका स्वरांत घोषणा दिली. ” हर हर महादेव” महाराष्ट्रातल्या मावळखोर्यांपासून त्यांनी आपल्या प्रयत्नांना आरंभ केला. साम-दाम-दंड-भेद यांचा उपयोग करत वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी ‘तोरणागड’ जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि मग त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. एका मागून एक गड आणि किल्ले जिंकून घेतले. युद्धात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा वापर जास्त केला. राक्षसी प्रवृत्तीचा अफझलखान भेटीचे ढोंग करून शिवाजीचा घात करायला आला होता. प्रतापगडावर भेट ठरल्याप्रमाणे मिठी मारण्याचे सोंग करून त्याने शिवाजीवर तलवार चालवली. पण शिवाजी महाराज सावध होतेच. हातात ठेवलेल्या वाघनखांनी अफझलखानचा कोथडाच काढला. पळून गेला म्हणून शाहिस्तेखान वाचला. शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करतांना येणाऱ्या प्रत्तेक संकटांला धीराने सामोरे गेले. पण त्यांचे सवंगडीही त्यांना समर्थ साथ देत होते.  सिंहगड घेतांना तानाजी पडला. खिंड लढवितांना  बाजीप्रभुणे छातीचा कोट केला . मुरारबाजी महाडकर, प्रतापराव गुजर अशा एकाहून एक शूर सवंगड्यानी आपले प्राण दिले . स्वराज्यात आता चोऱ्याऐंशी किल्ले आणि दोनशे चाळीस गड होते.
लोकांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याचा आग्रह केला. महाराजांनी आपल्या जिजाबाई यांच्याशी आणि जवळच्या सरदारांशी चर्चा करून राज्यभिषेक करवून घ्यायचा असे ठरवले. स्वराज्याची राजधानी रायगड ठरली. हिंदवी स्वराज्याचा राजा सिंहासनावर बसला. लोकांनी जयजयकार केला. जिजाऊंनी पाहिलेलं स्वप्न 1674 साली अखेर प्रत्यक्षात उतरलं. ६ जून १६७४ रोजी जिजाऊचा शिवबा छत्रपती झाला. काशीच्या गागाभट्टांकडे या सोहळ्याचे पौराहित्य सोपविण्यात आलं होतं. ६ जून १६७४ रोजी पहाटे पाचच्या सुमारास शिवबाचा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. छत्रपतींना तोफांची सलामी देण्यात आली. सिंहासनावर आरुढ होण्यापूर्वी महाराजांनी मातोश्रींच्या चरणी वंदन करुन त्यांचा आशीर्वाद घेतला. जिजाऊंच्या डोळांचं पारणं फिटलं. आपल्या हातानं शिवरायांची दृष्ट काढत जिजाऊ म्हणाल्या, शिबवा, तू महाराष्ट्राचा राजा झालास, रयतेचा राजा झालास. शिवबांचा राज्याभिषेक 'ह्याच देही ह्याच डोळा' पहावा यासाठी जिजाऊंनी आपला जीव जणू मुठीत आवळून ठेवला होता. कारण राज्याभिषेक झाल्यावर अवघ्या दहा दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.
                शिवाजी महाराजांनी आपले जीवन देश, देश आणि धर्म यासाठी वेचले.  संत तुकाराम हे त्याचे अध्यात्मिक गुरु होते. तर संत रामदास हे त्याचे राजकीय गुरु होते. शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक ६ जून, १६७४ साली रायगडावर साला. त्यानंतर थोड्याच काळात म्हणजे ६ वर्षानंतर ३ एप्रिल, १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले. रामदासांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले.

“निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ।।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।

                                                          शिवरायांचे कुलदैवत तुळजाभवानी

                महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन पीठे असून उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणार्‍या देवीचे हे स्थान जागृत असून नवसाला पावणारे आहे. संकटाला धावून येणार्‍या तुळजाभवानीचे इतिहासातही दाखले सापडतात. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजा तुळजाभावनीचे निस्सीम उपासक होते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराज दरवेळी देवीचे दर्शन घेत असत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात आईने महाराजांना तुळजाभवानी तलवार प्रदान केल्याचे सांगितले जाते. श्रीक्षेत्र तुळजापूर हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात डोंगर पठारावर वसलेले गाव आहे. समुद्रसपाटीपासून २७० फुट उंचावर असलेले हे तालुक्याचे ठिकाण उस्मानाबादपासून १८ किलोमीटर तर सोलापूरपासून ४४ किलोमीटरवर आहे. पूर्वी हा भाग डोंगराळ पण घनदाट अरण्याने व्यापलेला होता. या भागात चिंचेची खूप झाडे असल्याने त्यास चिंचपूर असेही म्हटले जायचे.

--/ चंद्रशेखर सावंत 

मंगळवार, २२ जानेवारी, २०१९

'वृक्ष मानव' विश्वेश्वर दत्त
                  नुकतीच काही दिवसापूर्वी बातमी समजली, उत्तराखंड मधले 'ट्री मॅनम्हणुन प्रख्यात असणाऱ्या श्री. विश्वेश्वर दत्त सकलानी यांना वयाच्या ९६ व्या वर्षी शुक्रवार दिनांक १८/०१/२०१९ रोजी वृद्धापकाळामुळे स्वर्गवास व्हावे लागले. फार वाईट वाटतं असे कानावर येऊ लागले तर. विश्वेश्वर दत्त यांचा जन्म उत्तराखंड च्या नवीन टहरी मध्येसकलाना पट्टीच्या पुजार गाव या ठिकाणी २ जून १९२२ साली झाला. ज्यांनी स्वतःचं संपुर्ण आयुष्य वृक्ष रोपणास घालवले.  विश्वेश्वर दत्त यांनी सर्दीथंडी न बघता एकच वृक्षारोपणाचे लक्ष्य ठेवले ज्याच्या मुळे त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या १० वर्षापासून त्यांना डोळ्यांचा त्रास होऊ लागला (Eye Hemorrhage) व दृष्टी निघून घेली.  त्यांच्या आयुष्यात त्यांनी ५० लाखाहून अधिक झाडे लावली. १९८६ साली त्यांना केंद्र सरकारने 'इंदिरा प्रियदर्शनी वृक्ष मित्र' (IPVM) या पुरस्काराने सन्मानित केले.

                 आपला देश औद्योगिक क्षेत्रात प्रगती करत असताना कित्येक ठिकाणी वृक्ष तोड केली जाते. MIDC's, Corporate Sectors, IT Parks या सारख्या वाढत जाणाऱ्या क्षेत्रात निसर्गाची हानी होत चालली आहे पण या सर्वांची निसर्गाबरोबर परतफेड म्हणुन विश्वेश्वर दत्त यांचीच होती कातो तर त्यांचा छंद व निसर्गप्रेम होतं. पर्यावरण वाचवणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्यामुळे आज जर पर्यावरणाचा ह्रास होत असेल तर पर्यावरण उद्या नक्कीच आपल्याला संपवेल यात मात्र शंका नाही. भारताची लोकसंख्या कोट्यवधीच्या घरात आहे. प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात किमान ५ वृक्षरोहण करुन त्याची पुर्तता करणे असे नवे धोरण सरकारने आखून ती योजना आमलात आणायला पाहिजे. बरोबर ना??

         वृक्षप्रेमी ‘विश्वेश्वर दत्त’ यांना निसर्गप्रेमी व ट्रेकर कडून भावपुर्ण आदरांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

                                                                                                                  --/चंद्रशेखर सावंतगुरुवार, २० डिसेंबर, २०१८

कलावंतीण दुर्ग
उंची : २३०० फूट 
ठिकाण : पनवेल 
जिल्हा : रायगड. 

मागच्या रविवारी कलावंतीण ट्रेक ला जायायचे आहे हे अचानक पणे ठरले. ट्रेक च्या अगोदर २ दिवसापूर्वी नाशिक येथे असणाऱ्या हरिहर ला जाण्याचा बेत ठरलेला आणि नेमके ट्रेकिंगच्याच दिवशी सकाळी निघताना कलावंतीण ट्रेक करायचे आहे असे ठरले. आत्ता ठरलेच आहे तर मागे हटायचे नाही किंवा निराश नाही व्हायायचे, याची समजूत घेऊन ठीक सकाळी ०४.०० वाजता ट्रेक साठी ठरलेले मित्र एकमेकांना संपर्क करून निघालो व ०५.०० वाजता मालाड येथून निघालो. अगदी ठीक ०६.३० ला म्हणजे अवघ्या ०१.३० तासात आम्ही पनवेल येथे पोहोचलो. तिकडे थोडासा रिलॅक्स व नाष्टा करून घेतला. कळंबोळी पासून पनवेल बायपास ने आल्यास मुंबई-पुणे हा महामार्ग जोडला जातो व त्याला लागूनच शेडुंग फाटा आहे. तेथून आत गेल्यास ४० मिनिटाच्या अंतरावर ठाकूरवाडी गाव लागते, तिथूनच डावीकडे वळण घेतल्यास कलावंतीण आणि प्रबळगडाकडे जाण्याचे मार्ग आहेत. ट्रेकिंग चालू केल्यानंतरच काही अंतरावर आम्हाला ५० रुपये प्रवेश फी आकारण्यात आली. 


कलावंतीण परिसरात आढळणारे विषारी सर्प 

प्रवेश फी दिल्यावरच परिसरात आढळणारे विषारी सर्प यांचा पोस्टर तिथे दिसला. आम्ही वाट बघतच होतो असा कोणता सरपटणारा प्राणी आम्हाला दिसतोय का पण सरडा मात्र तेवढा दिसला. पुढे आल्यानंतर २-३ शॉर्टकट्स दिसले त्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी करणार हे आम्हाला निश्चित माहित होते.

वाटेत मला दिसलेला सरडा 

कलावंतीण ट्रेक साठी तयार झालेले माझ्या सोबतचे ट्रेकर्स. डावीकडून अक्षय नाईक, गौरव, मी, दिव्येश आणि अक्षय धनावडे 

            पायथ्याशी पोहोचल्यावर उजव्या बाजूला मस्त टुमदार शहरी घरे, कॉटेजेस आणि डाव्या बाजूला मस्त निसर्गाने हिरवी शाल पांघरलेली. येथूनच मनाला एक वेगळा स्पर्श होण्यास सुरुवात झालेली. मस्त थंडगार वातावरणात मनमोहक निसर्गरम्य वातावरणाचे छायाचित्र टिपत व गप्पागोष्टी करत आम्हाला ०१.३० तासाभरांनी एक गाव लागले. परत तिकडे थोडासा आराम करून घेतला कारण मुख्य चढाई तर अजून बरीच बाकी होती.पाऊण तास वेळ घालवून परत नाष्ट्यासाठी मॅगी वैगरे खाऊन आम्ही परत गिर्यारोहणास सुरुवात केली.
मला फुलांना स्पर्श करण्याचा मोह आवरला नाही. 


निसर्गाचा आस्वाद घेणारा दिव्येश

निसर्गरम्य वातावरणात सकाळचा नाष्टा 
 निवांत 
           ०९.१५ च्या आसपास आम्ही काही अंतर पार केलेले. वाटेत उसाचा रस, लिंबू पाणी, कोकम सरबत, काकडी वैगरे या सारखे खाणे व पिणे चालूच होते. निम्मे अंतर पार केल्यानंतर खाली नजर टाकल्यावर विलोभनीय असे दृश्य मनाला उमंग देण्यास प्रेरित करत होते. असे सर्व होत असता ११.०० च्या आसपास आम्ही कलावंतीण च्या पायथ्याशी येउन पोहोचलो. १० मिनिटे वेळ आम्ही अगदी आवर्जून घेतला कारण पुढे निमुळता रस्ता आणि प्रचंड धोकादायक व बाजूला खोल दरी असल्यामुळे अवघड ठिकाणी थांबणे हे तर जमणारच नव्हते.           माहितीप्रमाणे प्रबळगड हा मुघलांच्या ताब्यात होता व प्रबळगडाचा किल्लेदार हा राजपूत घराण्याचा होता. त्याचे कुणी एका कलावंती वर प्रेम होते. ती तेथून निघून जाऊ नये म्हणून त्याने तिला प्रबळगडाच्या सुळक्यावर म्हणजेच कलावंतीण वर नेऊन ठेवले. तेव्हा पासून तो सुळका कलावंतीण म्हणून ओळखला जाऊ लागला. ह्या कलावंतीण आणि ठाकूरवाडीतील गावकऱ्यांचे नाते असल्यामुळे दर शिमग्याला हे गावकरी अगदी ना चुकता जातात व ठाकूर नृत्य करतात.
बाजूलाच दिव्येश होता. त्याला बोललो चल आत्ता ट्रेक करायला काय हरकत नाही. तत्पूर्वी सोबत असलेल्या बॅग्स आम्ही मुख्य पायथ्याशी असणाऱ्या एक छोट्याश्या गृहात ठेवले. चढाईसाठी सुरुवात चालू केल्यानंतर जेवढं पुढे जावे तेवढं रस्ता निमुळता होत होता. खरंच मित्रांनो... ट्रेकिंग म्हणजे आयुष्याला मिळालेलं वरदान होय. कठीण प्रसंगावर मात करून अगदी जिद्दीने पुढे जाता येते हे मात्र अगदी निसंकोचपणे. पायथ्याच्या येथून सुरुवात करताच दिसणारा दृश्य कलावंतीण दुर्ग च्या मुख्य पायथ्याच्या येथून टिपलेला छायाचित्र

          काही वेळातच म्हणजे ११.३५ ला आम्ही कलावंतीण सुळक्याच्या शेंड्यावर आलो आणि आनंदाला अंकुर फुटत राहिले, तरीसुद्धा पूर्णतः टॉप वर जाणे अजून बाकीचं होते. विचार केला एवढं चढलोय तर थोडेसेच बाकी आहे पण मनात मात्र भीती होतीच. बाजूला खोल दरी आणि वर १५-२० फूट टॉप वर जायायला फक्त दोरखंड आणि हा रॉक पॅच आम्ही पूर्ण केला व अंगावर आनंदाचे शहारे येत होते व आनंद बहुगुणी झाला. आमची इथवर पर्यंत केलेली वाटचाल व सोबतच प्रबळगडाचा माथा, पूर्वेकडे माथेरान पर्वतरांग, पश्चिमेकडे मुंबईशहर, उत्तरेकडे चंदेरी, उत्तरपश्चिमेकडे पेब चा किल्ला अर्थातच विकत गड, दक्षिणेकडे इरशाळ गड असा हा प्रवास स्वर्गाचाच आनंद देत होता. अर्धा-पाऊण तास फोटो वैगरे काढून झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासास सुरुवात केली. उतरताना सुद्धा तीच अवस्था विरुद्ध दिशेला म्हणजे शेंडा असणाऱ्या बाजूस चेहरा करून उतरावे लागत होते म्हणजे जरा जास्त सोयीस्कर. अगोदर बाकीच्या गडांचा अनुभव असला तरीही कोरलेल्या पायऱ्या उतरेपर्यंत जीव मुठीत होता.   On The Top in कलावंतीण 
    गौरव, अक्षय आणि मी वाटेतून दिसणारे मनमोहक दृश्ये 
           पूर्णतः पायऱ्या उतरल्यानंतर जंगल सफारी सुरु झाली काही अंतरावर आम्हाला एक गुंफा दिसली, या गुहेत जाताना सरपटून किंवा बसून जाण्यास पर्याय नाही. गुहेत शिरताना टॉर्च अनिवार्य आहे व सोबत माहिती दर्शक असावा तरच आतमध्ये जाणे योग्य. आम्ही मोबाईल फ्लॅशेस चा वापर करून गुहेत शिरण्याचे धाडस केले. गुहेत शिरल्यानंतर १०-११ फूट सरळ, नंतर डावीकडे ३-४ फूट असे पुढे आल्यावर एक खोली दिसते. आत आल्यावर प्रचंड गरम व्हायायला लागले कारण हवा वैगरे काहीच नव्हती. पूर्वीच्या काळी कदाचित गुप्त बैठक साठी ती असावी. गुहेत जाण्या-येण्यासाठी एकच मार्गाचा वापर करता येतो. गुहेच्या बाहेर आल्यानंतर मोकळी हवा मिळाली आणि प्रसन्न वाटू लागले. परतीच्या मार्गावर असताना एका उसाच्या रस विक्रेत्याकडे मला सुगरणीचे घरटे दिसले. मला सुगरणीचे आश्चर्य वाटते. मी हरखूनच गेलो. घरटं हातात घेतलं तर काय आश्चर्यच! त्याच्या कडे १०-११ घरटे होते मला आवडलेल्या पैकी मी तो एक विकत घेतला. मी एकदा कवयित्री बहिणाबाईंची सुगरणीवर आधारित कविता वाचलेली. !!अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला !! असा माझा कलावंतीण प्रवास आयुष्याला उमंग देणारा ट्रेक आत्ता शेवट पर्यंत लक्षात राहील. 

मी आणि सोबत सुगरणीचे घरटे 


उतरताना वाटेत दिसलेली गुंफा यशस्वी २३०० फूट उंच कलावंतीण ट्रेक 


                                                             --/ चंद्रशेखर सावंत 
                                                                              मालाड, मुंबई : ४०० ०९७


बुधवार, २ मे, २०१८

भटकंती-एक सफर

          शालेय जीवनात मे महिन्याची सुट्टी मिळाली कि चला मामाच्या गावी आणि ते सुद्धा अगदी एक महिना. पण आत्ता मात्र बदलत्या वेळेनुसार हे सर्व हरपलं. आत्ता वाढल्यात त्या दैनंदिन जीवनातल्या शर्यती पण या सर्वात आपलेपणाचा विसर पडू नये हे मात्र सांभाळावे. 

           सकाळी मस्त नारळ-सुपारी च्या बागेत अंघोळ. तिथून निघताच बाजूला कुपणीत असलेली करवंद तोडत घरी आल्यावर खासकरून भाकर-चटणी, पापड व हापूस आंबा ह्या सकाळच्या न्याहारी निमित्त सर्व मुंबईहून गेलेले मित्रमंडळी व भावंड यांच्या सोबत वेळ घालवून, परत भटकंती साठी आप्तेष्टांकडे भेटी निमित्त आमची सुरुवात व्हायायची व नंतर बैलगाडीवरून गुरांना चारा आणण्यासाठी बाय-पास मार्गाला जावे लागायचे. एवढं करता दुपार व्हायायची व नंतर ब्राह्मण भोजन झाल्यावर झोपाळ्यावर निवांत पडून कधी झोप लागायची ते कळायचच नाही. कारण मंद वारा आला कि पानांचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट ह्या सर्व गोष्टींची साथ होती. संध्याकाळी परत गाई-गुरांना घेऊन नदीवर त्यांना अंघोळ घालण्यासाठी मी मुद्दाम मामाबरोबर जात असे कारण गाव काय असतं हे मला मुळापासून अनुभवायचे होते. नंतर मग कधी जमल्यास मित्रांबरोबर क्रिकेट नाहीतर मग आंबे, फणस व काजू काढायला मी मामाबरोबर जंगलात भटकत असे. हे सर्व झाल्यावर मातीत राहून हात-पाय खूप मळलेले असत. नंतर मग मी नदीमध्ये डुबक्या मारायला निघायचो. असा दिनक्रम झाल्यावर संध्याकाळी मामाबरोबर बागेत झाडांना पाणी लावायला जाणे इत्यादी गोष्टी होत असत व नंतर गावी काय... जेवण लवकरच ०८.०० / ०८.३० ला व्हायायचे, तरी सुद्धा रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत आम्ही गावीच हिंडत बसायचो पण हेच आयुष्य परत मिळेल कि नाही ह्यात मात्र पुष्कळ शंका आहे.

          भटकंती म्हणजे माझ्यासाठी नवीन चैतन्यमय रहस्यच! मग गड-किल्ले चढायचे असो किंवा समुद्रकिनारी एकांत बसणे हे मला जास्त प्रेरणादायी वाटते. मुंबईचे जीवन संपूर्णतः विस्कळीत झालेले आहे, यात काय शंकाच नाही. सकाळी ०३.३० च्या वातावरणात असणारा हायवे अगदी हळुवार आणि हाच हायवे सकाळी ०७.३० ते ११.०० वाजेपर्यंत, मग संध्याकाळी सुद्धा तशीच वाहतुकीची कोंडी. मग लांबचा पल्ला गाठणाऱ्या माणसाला एकावेळी दीड-दोन तास तर नक्कीच फुकट घालवावे लागतात. वरून वाढत जाणारं प्रदुषण... छे! वरून दिवसाला टार्गेट्स असणारी कामे पार पाडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य, पण ह्या सर्व गोष्टीला सामोरं जाऊन आठवडा अखेरी एकदा तरी बाहेर फिरणे मनाला फार प्रेरित करते आणि निसर्गाच्या वातावरणात गेल्यास, स्फुर्तीमय जीवनशैली घडवून आणते.

          हा भटकंती नावाचा असणारा प्रकार फार अजब आहे. अजून बरेचगड गड -किल्ले चढायचे आणि बघायचे बाकी आहेत पण श्रीमंत श्री.छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड येथे पोहोचल्यावर अगदी मनापासून समाधान मिळतो. रायगड हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असून ८२० मीटर उंचीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे महत्व व स्थान पाहून १७ व्या शतकात आपल्या राज्याची राजधानी बनवली. रायगडचे प्राचीन नाव 'रायरी' सुद्धा होते. गडावर खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत चित्त दरवाजा, नाना दरवाजा, मशीदमोर्चा, महा दरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिकाई देऊळ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, कुशावर्त तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक,  हिरकणी टोक या वास्तू पाहण्यात अगदी मनाला सकारात्मक उर्जा मिळत राहते. अशाप्रकारेच कधी मित्रांसोबत मन झालं तर गड-किल्ले तर कधी बोरीवलीच्या नॅॅशनल पार्क मध्ये निवांत सायकलिंग, पण आजकाल फक्त रविवार सुट्टीचा दिवस मिळतो आणि तो सुद्धा घरीच आराम करून घालवावा लागतो. सध्यस्थिती अशी असतानाही कोकणात जायायची वेळ आली तर ती मी टाळत नाही मग ते महाड, दापोली किंवा रत्नागिरी असो... कोकणाला ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला असून प्रवास करायचा म्हणजे महाडच्या पुढचाच किंवा माणगांव नंतर लोणेरे फाट्यावरून गोरेगांव मार्गे मंडणगड-दापोली वैगेरे, कोकणातले रस्ते म्हणजे सुसाट एकदम आणि विशेष म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा झाडे, मधूनच वीटभट्टी आली कि दरवळणारा व कोकणात असलेल्याची जाणीव करून देणारा गंध व मधूनच त्यात नदी आणी वाहनचालक त्याच्या माहिती सवयी नुसार रस्त्यामधला सफेद पट्टा पकडून गाडी चालवत असतो, हेच दृश्य पावसाळ्यात अनुभवणे म्हणजे स्वर्गातल्या नयनरम्य दृश्यासारखे म्हणता येयील. स्वर्ग काय किंवा नरक काय हे मानवदेहाचा अंत झाल्याशिवाय दिसत नाही, पण भूतलावरचा स्वर्ग म्हणजे कोकणच! आणि ह्या सर्वामध्ये जुने मित्र असले कि आठवली जागृत होऊन प्रवास करणे म्हणजे अजून त्यात मज्जाच मज्जा... तसेच सणवार असले कि गावी जायायला अफाट मज्जा. मग शिमगा, चैत्र शुक्ल पोर्णिमा, पाडवा, गोकुळअष्टमी व गणेशोत्सव सारखे सण म्हणजे एक प्रकारचा नवाश्वास.
         
           "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हि तळटीपा म्हणून तसेच  भारतीय स्वातंत्रलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र लढ्याचे आद्यप्रवर्तक, 'केसरी' आणि 'मराठा' या वृत्तपत्राचे संस्थापक व लेखक, उत्कृष्ट वक्ते आणि स्वातंत्रसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म सुद्धा रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 'चिखलगावी' झाला.या भटकंतीच्या नादात असंख्य गोष्टी शिकता येतात पण आपण त्यात किती शिकतो हे आपल्यावर!

          'श्यामची आई' या पुस्तकात पालगडचा उल्लेख सतत आढळतो. साने गुरुजींचे गाव म्हणजेच दापोली तालुक्यातील 'पालगड' आज गावात साने गुरुजींच्या नावाची प्रार्थमिक व माध्यमिक शाळा आहे.


                                                                                               
                                                                                      --/ चंद्रशेखर सावंत

         

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

आयुष्याचा ताळेबंद

                   खरतर माझा जन्म होताच माझ्या मानवजन्म खात्याला सुरुवात झालेली. आत्ता प्रश्नपडेल मानवजन्म खाते म्हणजे काय? जसे आपले आयकर खाते किंवा बँक खाते असते तसेच. फक्त येथे आपण सद्गुणी का अवगुणी? हा ताळेबंद जर तयार करायचा असेल तर याचा अभ्यास आपल्यालाच करावा लागणार...आयकर खाते, बँक पासबुक यासारख्या अनेक गोष्टी आपल्या आयुष्याशी निगडीत आहेत आणि ह्या आपल्या आयुष्याच्या खात्यामध्ये कधीच लपविले नाही जात.
                 
                   मी माझ्या आयुष्यात मैत्रीसाठी किंवा इतर कारणात्सव जो कोणता समूह ठेवणार त्याप्रमाणे मला त्याचं फळ मिळत राहील, अशी माझी माझ्या मनाला पटलेली विचारभावना. 'पेरावे तसे उगवे' याचाच बोध घेऊन मुदत ठेव गुंतवणूक, पेंशन स्कीम, यासारख्या अनेक गोष्टी बचती साठी आहेत, ज्याचा आपल्याला वास्तवदर्शी व भविष्य काळात फायदा होईल. तसेच आपल्या सोबतीचेही आहे, आपण आपल्यासोबत कोणती मैत्री ठेवतो त्यावर सर्वकाही अवलंबून आहे.
                 
                   सध्या बचत खात्यामध्ये बँक तिच्या ठरलेल्या नियमानुसार ४% व्याज देते, याचाच बोध आपल्या आयुष्यातही आहे. आपण कधी कोणत्या संकटात असलो तर अचानक कधी आपल्याला जवळच्या मित्राची आठवण येते आणि संकटकाळी त्याचा हात आपल्या समोर येतो, म्हणजे हीच आपली पुण्याई. म्हणून खर्चाच्या बाबतीत प्रत्याकाकडे नियंत्रण असून प्रत्येकाने  गुंतवणुकीकडे जास्त भर द्यायायला हवे. त्याचप्रमाणे तुमचे जितके वर्तन चांगेल असेल, तितका तुमच्या चारित्र्यावर त्याचं परिणाम होत होत राहतो हे मात्र निश्चित!
                 
                    आयुष्यात फिक्स डेप्रीसीएबल असेट्स सारखी वस्तू म्हणजे आपले शरीर. देवाने ज्याप्रमाणे आपल्याला दिले आहे त्याप्रमाणे व्यवस्थित त्याची निगा राखणे आपले कर्तव्य आहे. इतक्या सुंदर शरीराला घाणेरड्या व्यसनाची चटक लागू दिली तर त्याचा डेप्रीसीएबल रेट व्यासानुसार वाढत जाईल आणि शेवटी तर काय सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हातातच आहे आपण आपली असेट्स अर्थातच आपली मालमत्ता कोणत्या डेप्रीसीएबल रेट मध्ये ठेवायची ते. मग शेवटी नशिबाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
                 
                    करंट लाईबिलीटी म्हणजेच जबाबदाऱ्या सारख्या होत असणाऱ्या गोष्टी म्हणजेच आपल्यावर होणारे इतरांचे उपकार. आत्ता प्रत्येकाच्या स्वइच्छेने उपकार जर समोरच्या व्यक्तीने आपल्यावर केले आहे, तर त्याची परतफेड करणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहेच आणि ते पार पडायलाच पाहिजे, नाहीतर लाईबिलीटी वाढत जाईल आणि हा आपला आयुष्याचा ताळेबंद व नंतर 'Computatation of Total life' तयार करायला Auditor तर वरचा आहेच! त्यामुळे गैरवर्तणूक होत असेल तर थांबवायलाच पाहिजे व सर्व काही समजून घेऊन योग्य वाटेवर चालायलाच हवे. शेवटी Scrutiny तर लागणारच आहे.

                                                                                                                                --/ चंद्रशेखर सावंत

गुरुवार, १३ जुलै, २०१७

प्रेरणादायी वर्षा

              पाऊस हा माझा अतिशय आवडीचा ॠतू आहे. त्याची सुरुवात म्हणजे रोमहर्षकह्या वर्षातल्या तीन हंगामातील उन्हाळ्या मुळे तर भूतलावरच्या प्रत्येक सजीवाला उन्हाचा त्रास सोसावा लागलेला असतो. ह्या सर्व होणाऱ्या त्रासामुळेच प्रत्येक सजीव उन्हाळा हंगाम संपायला आल्यानंतर पहिल्या पावसाळ्याची वाट बघत असतो आणि तो पहिला पाऊस नुसता एकटाच नाही येत तर त्याचजोडीला बराच आनंद, बऱ्याच आठवणी तो घेऊन येतो. पावसाळ्यात हवामान बदललेले असते आणि सर्वांची मने शीतल होतात.
प्रत्येकाला ओढ असते ती पहिल्या पावसाची. मस्त भिजल्यावर गरमा-गरम भजीपाव किंवा  वडापाव आणि त्यासोबतच चहा! आहाहा... मुंबईकरांपासून ते शेतकरी राज्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा पाऊस हा प्रत्येकाच्या मनाला सुखावणारा प्रेरणादायक ठरतो. वैफल्यग्रस्त वातावरणातून बाहेर काढणारा हा पाऊस म्हणजे माझ्यासाठी आगळा-वेगळाच. नदी तलाव तुडुंब भरलेले आणि डोंगरमाथ्यावरून धो धो कोसळणारा धबधबा म्हणजे स्वर्गातला नयनरम्य दृष्यासारखाच.
बेडकांचे डराव- डराव आवाज, मोरांचे नृत्य आणि पक्ष्यांचा कर्णमधुर किलबिलाट हे सर्व पावसाळ्यात होणारे आणि मनाला मनमोहक आनंद देणारे. त्यांना सुद्धा आपल्यासारखाच आनंद होत असतो फरक फक्त आपण आपल्याभाषेत आणि ते त्यांच्या भाषेत व्यक्त करतात.
          रविवारी सुट्टीच्या निमित्ताने घरात असताना आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज बऱ्याच लहानपणीच्या आठवणी देत आहे. आठवायला लागले ते शाळेचे दिवस, नवीन पुस्तके, सर्वच काही नवीनशाळेत बसल्यावर अचानक पाऊस जर आला तर त्याने भिजायच्या मोहातच टाकलेले असायचे आणि नंतर तेवढंच शाळा सुटल्याचे निमित्त असायचे.
निसर्गाच्या या मोहात प्रत्येकजण हरवून जात असतो. निसर्गाने सुद्धा हिरवी शाल पांघरलेली असते. पावसाळा हा शेतीसाठी एक चांगला हंगाम आहे. तसेच पावसाळ्यात श्रावण महिना सुद्धा असतो लागतो आणि ह्या महिन्यामध्ये तर सण-वार येत असतात. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमाकृष्ण जन्माष्टमी इत्या. तसेच नंतर गणेशोत्सव सुद्धा येतो.  
          पावसाळ्यात कधी रिमझिम पाऊस तर कधीकधी जोरात पडू लागतो यामुळे तर जेवढा आनंद तर त्याच्या जास्त पटीने नुकसान हि होण्याची शक्यता असते. जीवितहानी व वित्तहानी होण्याचीही शक्यता असते.
                                                                                                          --/ चंद्रशेखर सावंत