गुरुवार, ४ मे, २०१७

पाठीवरचा मायेचा हात

         
      


                        तुम्हाला  माहिती असेलच, आपल्या पाठीवर सगळ्यात जास्त मायेचा हात कोणाचा असतो ते…  निश्चित तुम्हाला माहिती असणार! प्रथम आपल्या पाठींवर सदैव मायेचा हात फिरवणारी म्हणजे आपली ‘आई’. तर याच माझ्या आईबद्दल एक आई-वेडा म्हणून लिहावेसे वाटते.
             चित्रपट बघून झाल्यानंतर मला माझ्या राहत्या घरी जाताना खूपच उशीर झालेला आणि त्यातही रस्त्यावर झालेली वाहनांची कोंडी, बाजूनेच एक चार चाकी खाजगी वाहन गेलं आणि त्या वाहनाच्या पाठीमागे लिहिलेलं 'ज्याच्याकडे आई नाही त्याच्याकडे काही नाही'. मी थोडा वेळ हे वाक्य बघून विचारातच पडलेलो आणि हे वाक्य जणू माझ्या ‘हृदयातून’ कोरून निघालं. सारखं-सारखं माझ्या डोळ्यासमोर हेच वाक्य दिसत होते. विचार करता-करता याच प्रश्नावर बरीच उत्तरे मिळाली आणि ह्या उत्तरांनी जणू माझं आता पुढील आयुष्यच बदललेले आहे. तसेच एक ‘आदर्श गृहिणी’ म्हणुन आणि दैनंदिन जीवनात माझ्यावर लक्ष ठेवणारी म्हणजे माझी आई.

         मालाड मधील नामांकित शाळा म्हणजेच 'उत्कर्ष मंदिर’. तर याच शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. शाळेच्या पहिल्याच दिवशी आई आणि बाबा हे दोघेही मला शाळेत सोडायला आलेले, मला काही माहितचं नव्हते, मी कुठे आलो आहे आणि काय करतोय ते. अशा वेळी माझ्या आईने माझ्यावर लक्ष ठेऊन, माझ्याबरोबर माझ्या बालवयाच्या आयुष्यामध्ये सुद्धा सहवासात राहून मला घडवले, हे क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत. शाळेमध्ये ‘शिशुवर्ग’ आणि ‘बालवर्ग’ झाल्यानंतर माझं ह्याच शाळेमध्ये प्राथमिक विभागात स्थलांतर झाले होते. प्राथमिक विभागाच्या इयत्ता पहिली मध्ये पहिल्याच दिवशी मला शाळेच्या नवीन वर्गापर्यंत सोडायला आलेली माझी आई, घरातला स्वयंपाक उत्तम रित्या पार पाडून झाल्यावर शाळेमध्ये मला सोडायला व आणायला येणारी म्हणजेच माझी आई, तसेच रोजचा गृहपाठ माझ्या कडून तपासून व माझ्या कडून शाळेचा गृहपाठ करवून घेणारी म्हणजे माझी आई. माझ्या आई मुळे मी शाळेच्या अभ्यासाक्रमात चांगला बदल घडवू तितका पाहत होतो. त्याच बरोबर प्रगतीपुस्तकावरही शाळेच्या बाई टिपण्णी रकान्यात मनाला आनंद देणाऱ्या वाक्यांचा समावेश करून देत असत व पुढील प्रगती साठी त्यामुळे नवीन जिद्द हाती येत असे, याचं सर्व श्रेय माझ्या आईलाच जातं. त्याच बरोबर मस्ती सुद्धा तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक हे हि मी निसंकोच पणे व्यक्त करतो. छात्रबोधिनी वर तक्रार नोंदणी साठी काही पाने असत आणि ती माझी पूर्णपणे भरलेली असत. जशी- जशी माझ्या मनाला उत्तमप्रकारे चांगली समजूत येत होती,  त्यानंतर मग आईने माझ्या कडे जास्त प्रमाणात लक्ष देणे कमी केलेले. तरीही ती घरी माझी 'मुलाखत'  नित्यनियामा प्रमाणे घ्यायायचीच. त्यामुळे मला  तिचा धाक असे. घरामध्ये कधी कार्यक्रम असले तर  ‘उत्कृष्ट ठराव’ आणि ‘व्यवस्थापन’ करण्या मध्ये मी माझ्या आईची परवानगी पहिली घेत असे आणि ती हि ‘स्पुर्थपणे’ परवानगी देत असे. तिनेही मला कधी नाराज केले नाही, याला म्हणतात आईची मुलावरची माया.  कधी कधी माझं जर काही चुकून चुकीच्या गोष्टी घडत असतील  तेव्हा ती मला अगदी घरच्या कुटुंबात समजावून सांगणारी म्हणजे माझी आईच.

        दहावीच्या परीक्षेनंतर माझा ‘आजोळी’ जाण्याचा बेत होता आणि तो यशस्वी पण ठरला. पण मला माझ्या आजोळी एकटेच जावे लागले, आजोळ चे ‘रमणीय वातावरण’ देखील उत्साहाने सहज पुढे सरकत होते. आजोळी जाऊन बरेच दिवस झालेले, पण नंतर-नंतर मला करमेनासे वाटू लागले, त्याचं  कारण म्हणजे माझ्या रोजच्या सहवासात असणारी म्हणजेच माझी आई ही गावी नव्हती. भ्रमणध्वनी द्वारे पण रोजच बोलून-बोलून तरी किती बोलणार? असा प्रश्न उपस्थित झालेला. अशा वेळी शेवटी-शेवटी माझ्या कडे एकच पर्याय राहिलेला एकतर मी परत मुंबई ला जाईन, नाहीतर आईला तरी गावी बोलवीन. थोड्याच काही वेळामध्ये आईनेच मला कळविले कि मी स्वतः गावी येत आहे. हे ऎकून मला तूर्त तरी खूप दिलखुलास आधार वाटलेला.

          एक लहान असतानाची हि एक गोष्ट, वयाच्या ९-१० वर्षापर्यंत तरी आई मला जेवण तिच्या हातानी भरवत असे, आणि नंतर जर कधी मी आजारी पडल्यास डोक्यावर हात फिरवून ताप आहे कि नाही याची सारखी-सारखी ‘तपासणी’ करून पाहणारी म्हणजे माझी सर्वप्रिय आईच. एकदा लहान असताना हिवतापाचा आजार माझ्या जोडीस आलेला त्यामुळे रुग्णालयात मी लवकर बरा व्हावा, म्हणून ‘स्व:हाताने’ मला जेवण भरवताना पाहिलेली माझी आई आजही डोळ्यासमोर आली कि डोळ्यातून ‘अश्रू’ पडल्याशिवाय राहवत नाही. आज मला चुकून किंवा मुद्दाम आजारी पडावं लागलं तरी चालेल, कारण मला माझ्या आईच्या हाताने मला भरवलेला जेवणाचा घास जणू ‘अमृताचा’ घासचं वाटेल. एकुलता एक मुलगा म्हणून ‘रक्षाबंधन’ च्या दिवशी माझ्या लेकराच्या हातात एकतरी ‘राखी’ असावी असे समजून मला राखी बांधून मीच तुझी ‘बहिण’ असे सांगितल्यावर माझ्या डोळ्यातून येणाऱ्या ‘अश्रूच्या’ धारांना मला सावरता येत नाही आणि माझे समाधान त्यातच आहे. शेवटी अजूनही खूप काही लिहिण्याचा प्रयत्न केला तरी एकचं ‘हृदयी’ आहे कि जर माझा या धरती वर ‘पुनर्जन्म’ झाला तर मला हीच माझी आत्ताची आई पाहिजे अशी सगळ्या भगवंताना माझ्याकडून प्रार्थना असेल. माझ्या जननी बद्दल जेवढे लिहू शकेन तेवढे कमीच आहे, कारण आईची माया हि ‘अनमोल’ असते.

                                                                                                 
                                                                                                       --/चंद्रशेखर सावंत

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

आठवणीतले काजू





वार्षिक परीक्षा झाल्यावर ओढ लागते ती नयनरम्य व आल्हाददायक वातावरणात रमण्याची. ओढ असते ती निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची, अर्थातच गावी जाण्याची. मे महिन्यात मुंबई ला उष्णतेची पातळी वाढू लागल्याकारणाने, गावी जाण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. आई बरोबर आजोळी जाण्याची मज्जा काही एकदम उत्स्फुर्तदायकच! त्यामुळे कित्येक लहानपणींच्या आठवणींना उजाळा येत राहतो. गावच्या वातावरणात राहू लागल्यावर मुंबई सारखे सकाळी उठायला लागताना गजर देखील लावायची गरज नाही पडत, हे आहे मानवी जीवनाला लाभलेले निसर्गाचे वरदान. सकाळी उठल्यावर बागेत किंवा नदीवर... दरीदरीतून वाहणाऱ्या पाण्यात अंघोळ करून झाली कि भाकर-चटणी व भाजलेला उडिदाचा पापड खाण्याची मज्जा सुद्धा आनंददायक! आणी मुद्दामून हे खाद्य मी न्याहरीस खाणार, नाहीतर मला गावची मज्जा कशी अनुभवायला मिळणार? हे सुद्धा आहे ना इथे... नंतर मग दुपारच्या भोजनाच्या अगोदर नातेवाईकांशी भेटीगाठी व दुपारी झोपताना बाहेर नैसर्गिक हवा आल्यावर झाडांच्या सळसळत्या पानांचा आवाज आणि गार वारा मानसिक समाधानाचा स्पर्श करून जातो. झोपून उठल्यावर मामाबरोबर बागेत पाणी लावायला जाणे किंवा शेतात फेरफटका आणि चालताना वाटेत आकर्षित करणारे करवंद किंवा आंबे, हे तर शंभर टक्के काढण्यास मनाला प्रवृत्त करतात. हे सर्व करून आल्यावर, गायी-बैलांचे पाय मोकळे करावयास व त्यांना चरण्यासाठी मी मामाबरोबर लहान असताना जात असे आणी नंतर मग गावातल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळायला माझी सुरुवात. प्रदोषकाळी हातपाय धुवून झाल्यावर देवाला नमस्कार करून परत मग नंतर कॅरम किंवा बुद्धिबळ सारखे खेळ मी खेळत असे ते रात्रीच्या जेवणापर्यंत आणी गावी काय जेवणाची वेळ संध्याकाळी ०८.०० वाजता, नंतर मग गावकरी मंडळी झोपी जात असत पण इथे मुंबईकरांना कसली झोप येते लवकर? मग त्या वेळेत मुंबईहून आलेल्या इतरांशी गप्पा गोष्टी मारण्यास सुद्धा, दिलखुलास आधार वाटू लागतो. असा माझा दैनंदिन दिनक्रम आजोळी असल्यावर होत होता.
सायंकाळी बागेतून परतत असताना आजीने मस्त अश्या काजूच्या बिया भाजायला ठेवलेल्या. पूर्वी आजी काजूच्या बिया भाजण्यासाठी शेतात जात असे, हे मला माहित होते आणि मी बघितले सुद्धा होते, पण अचानक घरा नजीकच्या एका ठिकाणी तिने काजूच्या बिया भाजायला सुरुवात केलेली, मी म्हटले आजी मी येऊ का मदतीला? आजीने मला तिथेच दम दिलेला कि लांब रहा ह्यापासून, उगाचच काजूसारखे द्रव्य ठिणगीसारखे लगेच उडाले तर... पण मी माझा हट्ट काय सोडला नाही आणि आजीचे वय सुद्धा झाले आहे. सोबत आठवण म्हणून एक-दोन छायाचित्रही टिपले. त्यानंतर भाजलेले काजू थंड झाल्यावर फोडताना आजीच्या हाताला जो काळपट रंग चढायचा, तो काय मग हप्ताभर पूर्णपणे जायायचा नाही. शेवटी काजुतले द्रव्य हे भाजल्यानंतर फोडतानाही लागतेच आणि ह्या गोष्टी साठी मदत करायला कोणी न सांगता, मी अगदी जायायचोच! महिनाभर काय सुट्टी घेतलेली असायची आणि माझे हात काळपट पडतील याची काय फिकीर नव्हती. त्यामुळे पूर्णतः गावकरी बनून राहणे मी पसंत करत असे, नाहीतर गावची मज्जा कशी लुटता येणार?

रानवाटेच्या फिरतीवर असताना मी आणि गावकरी बंधू खास काजू गोळा करण्यासाठी निघालेलो. त्याने मोठी टोपली पकडलेली, तर मी काटा पकडलेला. काटा म्हणजे उंच झाडावर असलेले काजू काढण्यासाठी तयार केलेले साधन, जे हलक्या बांबूला वर टोकावर ‘व्ही’ आकाराचे उलटे करून बांधत असत व ते घेऊन मी काजू काढावयास सुरुवात केली. खाली चार-पाच चादरींचाही पसारा केलेला, जेणेकरून त्यांना मार न लागता ते खाण्यास योग्य ठरेल. असे चालू असताना एक मात्र कोवळे काजू माझ्या कपाळावर वर बघता पडले व त्यातील द्रव्य माझ्या उजव्या डोळ्यात गेले. फार आणि बेफान माझे डोळे झोंबत राहिलेले. इतके ते झोंबलेले कि मसाला जाण्याहूनही अधिक. बाप रे! माझा सोबतीचा सुद्धा सावळागोंधळ झालेला कि आत्ता काय करावं? डोळ्यातून निघणाऱ्या पाण्यासोबत ते द्रव्य कमी झाले व झोंबायचेही, घरी जाऊन गप्पपणे झोपून गेलो कोणालाही न सांगता. संध्याकाळी उठल्यावर पहिले आरशात बघितले कि उजव्या डोळ्याने दिसतंय न बरोबर... काय अजून जास्त दुखापत तर झाली नाही ना... पण सुदैवाने तसे काही झाले नव्हते. तरीसुद्धा एक मात्र निश्चित झालेले, डोळ्याच्या सभोवताली द्रव्य पसरल्याने, काळपट पणाचा थर साचून राहिलेला, तो पण गेला काही दिवसांनी आणि घरच्यांचा ओरडा पडलेला ती एक वेगळी गोष्ट. पण ह्या प्रसंगातून डोळ्यासाठी सुदैवाने मात्र बचावलो.
काजूची भाजी खायायच्या अगोदर, नुसतेच कोवळे शिजवलेले काजू खायायची मज्जा एकदम झकासच!

--/ चंद्रशेखर सावंत

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

वाचनाच्या वळणावर...






करिअरशी कसरत करत असताना, वेळात वेळ काढून केलेले वैचारिक पातळीवरचे योग्यतेचे निर्णय किंवा योग्यता घडवण्यास पात्र ठरणारे बदल, याची विद्वत्ता मला 'वाचनातून' आणि 'लेखनातूनच' मिळत राहतेय.
मित्र आणि मैत्रिणींनो, एक मात्र खरे... वाचनामुळे ज्ञानात भर पडते तर लिखाणामुळे शब्दरचना कळतात. ह्या माझ्या दैनंदिनी परिवर्तनामध्ये मी ‘परिपक्व’ होत राहीन तितका कमी. आयुष्यात चुका तर काय होतच राहतात आणि माणसाकडून चूक नाही होणार तर कोणाकडून होणार?  पण त्या सुधारायचा असतील तर योग्य विचारांसाठी योग्य विचारात्मक वाचन व अनुभव हाच उत्तम पर्याय असं मला तरी वाटतं... आणि हाच माझा वक्तशीर छंद. तुम्हीही तुमचा योग्य छंद जोपासा कारण हाच छंद तुम्हाला तुमचं आयुष्य घडवण्यास प्रवृत्त करतो व दिशा दाखवून देतो.
आयुष्याच्या वाटेवर जगताना योग्य परिवर्तन घडवणाऱ्या माणसाने योग्य छंद हा अवश्य बाळगावा. त्यातूनच त्याला नीर-निराळ्या प्रकारचे धडे मिळत राहतात. वैफल्यग्रस्त स्थितीमध्ये तर स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण केल्यावर एक समंजस प्रवृत्तीनुसार एक वेगळाच मार्ग अर्थातच आत्मबल आपला वाढू लागतो. याचं मूळ कारण म्हणजे वाचनातून निर्मिती झालेली समंजस प्रवृत्तीची निर्माण होणारी पातळी.            
मोत्याचे मणी सारखेच नसतात, त्याचप्रमाणे बाह्यजगात वावरतानाही अगदी सर्वच काही योग्य विचारांचे नसतात. तर अश्या सर्व गोष्टींना तोंड देऊन ‘वाचन आणि लिखाण’ माझं या जगातील दुसरं आयुष्यसुद्धा! जे मी इच्छा झाल्यावर स्वतःला त्यात हरवूनही घेतो. कारण मला एवढं तर नक्कीच माहिती आहे, अर्थपूर्ण पुस्तके आणि अनुभव कधी खोटं बोलत नाही. पुस्तके व अनुभव माणसाला घडवतात आणि जीवन जगण्याची नवी उमंग देतात. या विचारवादी मनामध्ये बाह्यगोष्टी समजायला लागल्यावर तसेच प्रवासवर्णनीय, चरित्रात्मक तसेच स्मृतीकारक इत्या.  स्वविचारांचे ‘लेख’ किंवा ‘काव्य’ एका लेखणीतून कागदावर अक्षरी उमटवणे असा माझा छंद.

--/ चंद्रशेखर सावंत
मालाड, मुंबई : ४०० ०९७