बुधवार, २ मे, २०१८

भटकंती-एक सफर





          शालेय जीवनात मे महिन्याची सुट्टी मिळाली कि चला मामाच्या गावी आणि ते सुद्धा अगदी एक महिना. पण आत्ता मात्र बदलत्या वेळेनुसार हे सर्व हरपलं. आत्ता वाढल्यात त्या दैनंदिन जीवनातल्या शर्यती पण या सर्वात आपलेपणाचा विसर पडू नये हे मात्र सांभाळावे. 

           सकाळी मस्त नारळ-सुपारी च्या बागेत अंघोळ. तिथून निघताच बाजूला कुपणीत असलेली करवंद तोडत घरी आल्यावर खासकरून भाकर-चटणी, पापड व हापूस आंबा ह्या सकाळच्या न्याहारी निमित्त सर्व मुंबईहून गेलेले मित्रमंडळी व भावंड यांच्या सोबत वेळ घालवून, परत भटकंती साठी आप्तेष्टांकडे भेटी निमित्त आमची सुरुवात व्हायायची व नंतर बैलगाडीवरून गुरांना चारा आणण्यासाठी बाय-पास मार्गाला जावे लागायचे. एवढं करता दुपार व्हायायची व नंतर ब्राह्मण भोजन झाल्यावर झोपाळ्यावर निवांत पडून कधी झोप लागायची ते कळायचच नाही. कारण मंद वारा आला कि पानांचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट ह्या सर्व गोष्टींची साथ होती. संध्याकाळी परत गाई-गुरांना घेऊन नदीवर त्यांना अंघोळ घालण्यासाठी मी मुद्दाम मामाबरोबर जात असे कारण गाव काय असतं हे मला मुळापासून अनुभवायचे होते. नंतर मग कधी जमल्यास मित्रांबरोबर क्रिकेट नाहीतर मग आंबे, फणस व काजू काढायला मी मामाबरोबर जंगलात भटकत असे. हे सर्व झाल्यावर मातीत राहून हात-पाय खूप मळलेले असत. नंतर मग मी नदीमध्ये डुबक्या मारायला निघायचो. असा दिनक्रम झाल्यावर संध्याकाळी मामाबरोबर बागेत झाडांना पाणी लावायला जाणे इत्यादी गोष्टी होत असत व नंतर गावी काय... जेवण लवकरच ०८.०० / ०८.३० ला व्हायायचे, तरी सुद्धा रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत आम्ही गावीच हिंडत बसायचो पण हेच आयुष्य परत मिळेल कि नाही ह्यात मात्र पुष्कळ शंका आहे.

          भटकंती म्हणजे माझ्यासाठी नवीन चैतन्यमय रहस्यच! मग गड-किल्ले चढायचे असो किंवा समुद्रकिनारी एकांत बसणे हे मला जास्त प्रेरणादायी वाटते. मुंबईचे जीवन संपूर्णतः विस्कळीत झालेले आहे, यात काय शंकाच नाही. सकाळी ०३.३० च्या वातावरणात असणारा हायवे अगदी हळुवार आणि हाच हायवे सकाळी ०७.३० ते ११.०० वाजेपर्यंत, मग संध्याकाळी सुद्धा तशीच वाहतुकीची कोंडी. मग लांबचा पल्ला गाठणाऱ्या माणसाला एकावेळी दीड-दोन तास तर नक्कीच फुकट घालवावे लागतात. वरून वाढत जाणारं प्रदुषण... छे! वरून दिवसाला टार्गेट्स असणारी कामे पार पाडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य, पण ह्या सर्व गोष्टीला सामोरं जाऊन आठवडा अखेरी एकदा तरी बाहेर फिरणे मनाला फार प्रेरित करते आणि निसर्गाच्या वातावरणात गेल्यास, स्फुर्तीमय जीवनशैली घडवून आणते.

          हा भटकंती नावाचा असणारा प्रकार फार अजब आहे. अजून बरेचगड गड -किल्ले चढायचे आणि बघायचे बाकी आहेत पण श्रीमंत श्री.छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड येथे पोहोचल्यावर अगदी मनापासून समाधान मिळतो. रायगड हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असून ८२० मीटर उंचीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे महत्व व स्थान पाहून १७ व्या शतकात आपल्या राज्याची राजधानी बनवली. रायगडचे प्राचीन नाव 'रायरी' सुद्धा होते. गडावर खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत चित्त दरवाजा, नाना दरवाजा, मशीदमोर्चा, महा दरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिकाई देऊळ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, कुशावर्त तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक,  हिरकणी टोक या वास्तू पाहण्यात अगदी मनाला सकारात्मक उर्जा मिळत राहते. अशाप्रकारेच कधी मित्रांसोबत मन झालं तर गड-किल्ले तर कधी बोरीवलीच्या नॅॅशनल पार्क मध्ये निवांत सायकलिंग, पण आजकाल फक्त रविवार सुट्टीचा दिवस मिळतो आणि तो सुद्धा घरीच आराम करून घालवावा लागतो. सध्यस्थिती अशी असतानाही कोकणात जायायची वेळ आली तर ती मी टाळत नाही मग ते महाड, दापोली किंवा रत्नागिरी असो... कोकणाला ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला असून प्रवास करायचा म्हणजे महाडच्या पुढचाच किंवा माणगांव नंतर लोणेरे फाट्यावरून गोरेगांव मार्गे मंडणगड-दापोली वैगेरे, कोकणातले रस्ते म्हणजे सुसाट एकदम आणि विशेष म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा झाडे, मधूनच वीटभट्टी आली कि दरवळणारा व कोकणात असलेल्याची जाणीव करून देणारा गंध व मधूनच त्यात नदी आणी वाहनचालक त्याच्या माहिती सवयी नुसार रस्त्यामधला सफेद पट्टा पकडून गाडी चालवत असतो, हेच दृश्य पावसाळ्यात अनुभवणे म्हणजे स्वर्गातल्या नयनरम्य दृश्यासारखे म्हणता येयील. स्वर्ग काय किंवा नरक काय हे मानवदेहाचा अंत झाल्याशिवाय दिसत नाही, पण भूतलावरचा स्वर्ग म्हणजे कोकणच! आणि ह्या सर्वामध्ये जुने मित्र असले कि आठवली जागृत होऊन प्रवास करणे म्हणजे अजून त्यात मज्जाच मज्जा... तसेच सणवार असले कि गावी जायायला अफाट मज्जा. मग शिमगा, चैत्र शुक्ल पोर्णिमा, पाडवा, गोकुळअष्टमी व गणेशोत्सव सारखे सण म्हणजे एक प्रकारचा नवाश्वास.
         
           "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हि तळटीपा म्हणून तसेच  भारतीय स्वातंत्रलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र लढ्याचे आद्यप्रवर्तक, 'केसरी' आणि 'मराठा' या वृत्तपत्राचे संस्थापक व लेखक, उत्कृष्ट वक्ते आणि स्वातंत्रसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म सुद्धा रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 'चिखलगावी' झाला.या भटकंतीच्या नादात असंख्य गोष्टी शिकता येतात पण आपण त्यात किती शिकतो हे आपल्यावर!

          'श्यामची आई' या पुस्तकात पालगडचा उल्लेख सतत आढळतो. साने गुरुजींचे गाव म्हणजेच दापोली तालुक्यातील 'पालगड' आज गावात साने गुरुजींच्या नावाची प्रार्थमिक व माध्यमिक शाळा आहे.


                                                                                               
                                                                                      --/ चंद्रशेखर सावंत

         

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

आयुष्याचा ताळेबंद





                   खरतर माझा जन्म होताच माझ्या मानवजन्म खात्याला सुरुवात झालेली. आत्ता प्रश्नपडेल मानवजन्म खाते म्हणजे काय? जसे आपले आयकर खाते किंवा बँक खाते असते तसेच. फक्त येथे आपण सद्गुणी का अवगुणी? हा ताळेबंद जर तयार करायचा असेल तर याचा अभ्यास आपल्यालाच करावा लागणार...आयकर खाते, बँक पासबुक यासारख्या अनेक गोष्टी आपल्या आयुष्याशी निगडीत आहेत आणि ह्या आपल्या आयुष्याच्या खात्यामध्ये कधीच लपविले नाही जात.
                 
                   मी माझ्या आयुष्यात मैत्रीसाठी किंवा इतर कारणात्सव जो कोणता समूह ठेवणार त्याप्रमाणे मला त्याचं फळ मिळत राहील, अशी माझी माझ्या मनाला पटलेली विचारभावना. 'पेरावे तसे उगवे' याचाच बोध घेऊन मुदत ठेव गुंतवणूक, पेंशन स्कीम, यासारख्या अनेक गोष्टी बचती साठी आहेत, ज्याचा आपल्याला वास्तवदर्शी व भविष्य काळात फायदा होईल. तसेच आपल्या सोबतीचेही आहे, आपण आपल्यासोबत कोणती मैत्री ठेवतो त्यावर सर्वकाही अवलंबून आहे.
                 
                   सध्या बचत खात्यामध्ये बँक तिच्या ठरलेल्या नियमानुसार ४% व्याज देते, याचाच बोध आपल्या आयुष्यातही आहे. आपण कधी कोणत्या संकटात असलो तर अचानक कधी आपल्याला जवळच्या मित्राची आठवण येते आणि संकटकाळी त्याचा हात आपल्या समोर येतो, म्हणजे हीच आपली पुण्याई. म्हणून खर्चाच्या बाबतीत प्रत्याकाकडे नियंत्रण असून प्रत्येकाने  गुंतवणुकीकडे जास्त भर द्यायायला हवे. त्याचप्रमाणे तुमचे जितके वर्तन चांगेल असेल, तितका तुमच्या चारित्र्यावर त्याचं परिणाम होत होत राहतो हे मात्र निश्चित!
                 
                    आयुष्यात फिक्स डेप्रीसीएबल असेट्स सारखी वस्तू म्हणजे आपले शरीर. देवाने ज्याप्रमाणे आपल्याला दिले आहे त्याप्रमाणे व्यवस्थित त्याची निगा राखणे आपले कर्तव्य आहे. इतक्या सुंदर शरीराला घाणेरड्या व्यसनाची चटक लागू दिली तर त्याचा डेप्रीसीएबल रेट व्यासानुसार वाढत जाईल आणि शेवटी तर काय सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हातातच आहे आपण आपली असेट्स अर्थातच आपली मालमत्ता कोणत्या डेप्रीसीएबल रेट मध्ये ठेवायची ते. मग शेवटी नशिबाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
                 
                    करंट लाईबिलीटी म्हणजेच जबाबदाऱ्या सारख्या होत असणाऱ्या गोष्टी म्हणजेच आपल्यावर होणारे इतरांचे उपकार. आत्ता प्रत्येकाच्या स्वइच्छेने उपकार जर समोरच्या व्यक्तीने आपल्यावर केले आहे, तर त्याची परतफेड करणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहेच आणि ते पार पडायलाच पाहिजे, नाहीतर लाईबिलीटी वाढत जाईल आणि हा आपला आयुष्याचा ताळेबंद व नंतर 'Computatation of Total life' तयार करायला Auditor तर वरचा आहेच! त्यामुळे गैरवर्तणूक होत असेल तर थांबवायलाच पाहिजे व सर्व काही समजून घेऊन योग्य वाटेवर चालायलाच हवे. शेवटी Scrutiny तर लागणारच आहे.

                                                                                                                                --/ चंद्रशेखर सावंत

गुरुवार, १३ जुलै, २०१७

प्रेरणादायी वर्षा





              पाऊस हा माझा अतिशय आवडीचा ॠतू आहे. त्याची सुरुवात म्हणजे रोमहर्षक, ह्या वर्षातल्या तीन हंगामातील उन्हाळ्या मुळे तर भूतलावरच्या प्रत्येक सजीवाला उन्हाचा त्रास सोसावा लागलेला असतो. ह्या सर्व होणाऱ्या त्रासामुळेच प्रत्येक सजीव उन्हाळा हंगाम संपायला आल्यानंतर पहिल्या पावसाळ्याची वाट बघत असतो आणि तो पहिला पाऊस नुसता एकटाच नाही येत तर त्याचजोडीला बराच आनंद, बऱ्याच आठवणी तो घेऊन येतो. पावसाळ्यात हवामान बदललेले असते आणि सर्वांची मने शीतल होतात.
प्रत्येकाला ओढ असते ती पहिल्या पावसाची. मस्त भिजल्यावर गरमा-गरम भजीपाव किंवा  वडापाव आणि त्यासोबतच चहा! आहाहा... मुंबईकरांपासून ते शेतकरी राज्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा पाऊस हा प्रत्येकाच्या मनाला सुखावणारा प्रेरणादायक ठरतो. वैफल्यग्रस्त वातावरणातून बाहेर काढणारा हा पाऊस म्हणजे माझ्यासाठी आगळा-वेगळाच. नदी तलाव तुडुंब भरलेले आणि डोंगरमाथ्यावरून धो धो कोसळणारा धबधबा म्हणजे स्वर्गातला नयनरम्य दृष्यासारखाच.
बेडकांचे डराव- डराव आवाज, मोरांचे नृत्य आणि पक्ष्यांचा कर्णमधुर किलबिलाट हे सर्व पावसाळ्यात होणारे आणि मनाला मनमोहक आनंद देणारे. त्यांना सुद्धा आपल्यासारखाच आनंद होत असतो फरक फक्त आपण आपल्याभाषेत आणि ते त्यांच्या भाषेत व्यक्त करतात.
          रविवारी सुट्टीच्या निमित्ताने घरात असताना आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज बऱ्याच लहानपणीच्या आठवणी देत आहे. आठवायला लागले ते शाळेचे दिवस, नवीन पुस्तके, सर्वच काही नवीन. शाळेत बसल्यावर अचानक पाऊस जर आला तर त्याने भिजायच्या मोहातच टाकलेले असायचे आणि नंतर तेवढंच शाळा सुटल्याचे निमित्त असायचे.
निसर्गाच्या या मोहात प्रत्येकजण हरवून जात असतो. निसर्गाने सुद्धा हिरवी शाल पांघरलेली असते. पावसाळा हा शेतीसाठी एक चांगला हंगाम आहे. तसेच पावसाळ्यात श्रावण महिना सुद्धा असतो लागतो आणि ह्या महिन्यामध्ये तर सण-वार येत असतात. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी इत्या. तसेच नंतर गणेशोत्सव सुद्धा येतो.  
          पावसाळ्यात कधी रिमझिम पाऊस तर कधीकधी जोरात पडू लागतो यामुळे तर जेवढा आनंद तर त्याच्या जास्त पटीने नुकसान हि होण्याची शक्यता असते. जीवितहानी व वित्तहानी होण्याचीही शक्यता असते.
                                                                                                          --/ चंद्रशेखर सावंत


गुरुवार, ४ मे, २०१७

पाठीवरचा मायेचा हात

         
      


                        तुम्हाला  माहिती असेलच, आपल्या पाठीवर सगळ्यात जास्त मायेचा हात कोणाचा असतो ते…  निश्चित तुम्हाला माहिती असणार! प्रथम आपल्या पाठींवर सदैव मायेचा हात फिरवणारी म्हणजे आपली ‘आई’. तर याच माझ्या आईबद्दल एक आई-वेडा म्हणून लिहावेसे वाटते.
             चित्रपट बघून झाल्यानंतर मला माझ्या राहत्या घरी जाताना खूपच उशीर झालेला आणि त्यातही रस्त्यावर झालेली वाहनांची कोंडी, बाजूनेच एक चार चाकी खाजगी वाहन गेलं आणि त्या वाहनाच्या पाठीमागे लिहिलेलं 'ज्याच्याकडे आई नाही त्याच्याकडे काही नाही'. मी थोडा वेळ हे वाक्य बघून विचारातच पडलेलो आणि हे वाक्य जणू माझ्या ‘हृदयातून’ कोरून निघालं. सारखं-सारखं माझ्या डोळ्यासमोर हेच वाक्य दिसत होते. विचार करता-करता याच प्रश्नावर बरीच उत्तरे मिळाली आणि ह्या उत्तरांनी जणू माझं आता पुढील आयुष्यच बदललेले आहे. तसेच एक ‘आदर्श गृहिणी’ म्हणुन आणि दैनंदिन जीवनात माझ्यावर लक्ष ठेवणारी म्हणजे माझी आई.

         मालाड मधील नामांकित शाळा म्हणजेच 'उत्कर्ष मंदिर’. तर याच शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. शाळेच्या पहिल्याच दिवशी आई आणि बाबा हे दोघेही मला शाळेत सोडायला आलेले, मला काही माहितचं नव्हते, मी कुठे आलो आहे आणि काय करतोय ते. अशा वेळी माझ्या आईने माझ्यावर लक्ष ठेऊन, माझ्याबरोबर माझ्या बालवयाच्या आयुष्यामध्ये सुद्धा सहवासात राहून मला घडवले, हे क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत. शाळेमध्ये ‘शिशुवर्ग’ आणि ‘बालवर्ग’ झाल्यानंतर माझं ह्याच शाळेमध्ये प्राथमिक विभागात स्थलांतर झाले होते. प्राथमिक विभागाच्या इयत्ता पहिली मध्ये पहिल्याच दिवशी मला शाळेच्या नवीन वर्गापर्यंत सोडायला आलेली माझी आई, घरातला स्वयंपाक उत्तम रित्या पार पाडून झाल्यावर शाळेमध्ये मला सोडायला व आणायला येणारी म्हणजेच माझी आई, तसेच रोजचा गृहपाठ माझ्या कडून तपासून व माझ्या कडून शाळेचा गृहपाठ करवून घेणारी म्हणजे माझी आई. माझ्या आई मुळे मी शाळेच्या अभ्यासाक्रमात चांगला बदल घडवू तितका पाहत होतो. त्याच बरोबर प्रगतीपुस्तकावरही शाळेच्या बाई टिपण्णी रकान्यात मनाला आनंद देणाऱ्या वाक्यांचा समावेश करून देत असत व पुढील प्रगती साठी त्यामुळे नवीन जिद्द हाती येत असे, याचं सर्व श्रेय माझ्या आईलाच जातं. त्याच बरोबर मस्ती सुद्धा तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक हे हि मी निसंकोच पणे व्यक्त करतो. छात्रबोधिनी वर तक्रार नोंदणी साठी काही पाने असत आणि ती माझी पूर्णपणे भरलेली असत. जशी- जशी माझ्या मनाला उत्तमप्रकारे चांगली समजूत येत होती,  त्यानंतर मग आईने माझ्या कडे जास्त प्रमाणात लक्ष देणे कमी केलेले. तरीही ती घरी माझी 'मुलाखत'  नित्यनियामा प्रमाणे घ्यायायचीच. त्यामुळे मला  तिचा धाक असे. घरामध्ये कधी कार्यक्रम असले तर  ‘उत्कृष्ट ठराव’ आणि ‘व्यवस्थापन’ करण्या मध्ये मी माझ्या आईची परवानगी पहिली घेत असे आणि ती हि ‘स्पुर्थपणे’ परवानगी देत असे. तिनेही मला कधी नाराज केले नाही, याला म्हणतात आईची मुलावरची माया.  कधी कधी माझं जर काही चुकून चुकीच्या गोष्टी घडत असतील  तेव्हा ती मला अगदी घरच्या कुटुंबात समजावून सांगणारी म्हणजे माझी आईच.

        दहावीच्या परीक्षेनंतर माझा ‘आजोळी’ जाण्याचा बेत होता आणि तो यशस्वी पण ठरला. पण मला माझ्या आजोळी एकटेच जावे लागले, आजोळ चे ‘रमणीय वातावरण’ देखील उत्साहाने सहज पुढे सरकत होते. आजोळी जाऊन बरेच दिवस झालेले, पण नंतर-नंतर मला करमेनासे वाटू लागले, त्याचं  कारण म्हणजे माझ्या रोजच्या सहवासात असणारी म्हणजेच माझी आई ही गावी नव्हती. भ्रमणध्वनी द्वारे पण रोजच बोलून-बोलून तरी किती बोलणार? असा प्रश्न उपस्थित झालेला. अशा वेळी शेवटी-शेवटी माझ्या कडे एकच पर्याय राहिलेला एकतर मी परत मुंबई ला जाईन, नाहीतर आईला तरी गावी बोलवीन. थोड्याच काही वेळामध्ये आईनेच मला कळविले कि मी स्वतः गावी येत आहे. हे ऎकून मला तूर्त तरी खूप दिलखुलास आधार वाटलेला.

          एक लहान असतानाची हि एक गोष्ट, वयाच्या ९-१० वर्षापर्यंत तरी आई मला जेवण तिच्या हातानी भरवत असे, आणि नंतर जर कधी मी आजारी पडल्यास डोक्यावर हात फिरवून ताप आहे कि नाही याची सारखी-सारखी ‘तपासणी’ करून पाहणारी म्हणजे माझी सर्वप्रिय आईच. एकदा लहान असताना हिवतापाचा आजार माझ्या जोडीस आलेला त्यामुळे रुग्णालयात मी लवकर बरा व्हावा, म्हणून ‘स्व:हाताने’ मला जेवण भरवताना पाहिलेली माझी आई आजही डोळ्यासमोर आली कि डोळ्यातून ‘अश्रू’ पडल्याशिवाय राहवत नाही. आज मला चुकून किंवा मुद्दाम आजारी पडावं लागलं तरी चालेल, कारण मला माझ्या आईच्या हाताने मला भरवलेला जेवणाचा घास जणू ‘अमृताचा’ घासचं वाटेल. एकुलता एक मुलगा म्हणून ‘रक्षाबंधन’ च्या दिवशी माझ्या लेकराच्या हातात एकतरी ‘राखी’ असावी असे समजून मला राखी बांधून मीच तुझी ‘बहिण’ असे सांगितल्यावर माझ्या डोळ्यातून येणाऱ्या ‘अश्रूच्या’ धारांना मला सावरता येत नाही आणि माझे समाधान त्यातच आहे. शेवटी अजूनही खूप काही लिहिण्याचा प्रयत्न केला तरी एकचं ‘हृदयी’ आहे कि जर माझा या धरती वर ‘पुनर्जन्म’ झाला तर मला हीच माझी आत्ताची आई पाहिजे अशी सगळ्या भगवंताना माझ्याकडून प्रार्थना असेल. माझ्या जननी बद्दल जेवढे लिहू शकेन तेवढे कमीच आहे, कारण आईची माया हि ‘अनमोल’ असते.

                                                                                                 
                                                                                                       --/चंद्रशेखर सावंत

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

आठवणीतले काजू





वार्षिक परीक्षा झाल्यावर ओढ लागते ती नयनरम्य व आल्हाददायक वातावरणात रमण्याची. ओढ असते ती निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची, अर्थातच गावी जाण्याची. मे महिन्यात मुंबई ला उष्णतेची पातळी वाढू लागल्याकारणाने, गावी जाण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. आई बरोबर आजोळी जाण्याची मज्जा काही एकदम उत्स्फुर्तदायकच! त्यामुळे कित्येक लहानपणींच्या आठवणींना उजाळा येत राहतो. गावच्या वातावरणात राहू लागल्यावर मुंबई सारखे सकाळी उठायला लागताना गजर देखील लावायची गरज नाही पडत, हे आहे मानवी जीवनाला लाभलेले निसर्गाचे वरदान. सकाळी उठल्यावर बागेत किंवा नदीवर... दरीदरीतून वाहणाऱ्या पाण्यात अंघोळ करून झाली कि भाकर-चटणी व भाजलेला उडिदाचा पापड खाण्याची मज्जा सुद्धा आनंददायक! आणी मुद्दामून हे खाद्य मी न्याहरीस खाणार, नाहीतर मला गावची मज्जा कशी अनुभवायला मिळणार? हे सुद्धा आहे ना इथे... नंतर मग दुपारच्या भोजनाच्या अगोदर नातेवाईकांशी भेटीगाठी व दुपारी झोपताना बाहेर नैसर्गिक हवा आल्यावर झाडांच्या सळसळत्या पानांचा आवाज आणि गार वारा मानसिक समाधानाचा स्पर्श करून जातो. झोपून उठल्यावर मामाबरोबर बागेत पाणी लावायला जाणे किंवा शेतात फेरफटका आणि चालताना वाटेत आकर्षित करणारे करवंद किंवा आंबे, हे तर शंभर टक्के काढण्यास मनाला प्रवृत्त करतात. हे सर्व करून आल्यावर, गायी-बैलांचे पाय मोकळे करावयास व त्यांना चरण्यासाठी मी मामाबरोबर लहान असताना जात असे आणी नंतर मग गावातल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळायला माझी सुरुवात. प्रदोषकाळी हातपाय धुवून झाल्यावर देवाला नमस्कार करून परत मग नंतर कॅरम किंवा बुद्धिबळ सारखे खेळ मी खेळत असे ते रात्रीच्या जेवणापर्यंत आणी गावी काय जेवणाची वेळ संध्याकाळी ०८.०० वाजता, नंतर मग गावकरी मंडळी झोपी जात असत पण इथे मुंबईकरांना कसली झोप येते लवकर? मग त्या वेळेत मुंबईहून आलेल्या इतरांशी गप्पा गोष्टी मारण्यास सुद्धा, दिलखुलास आधार वाटू लागतो. असा माझा दैनंदिन दिनक्रम आजोळी असल्यावर होत होता.
सायंकाळी बागेतून परतत असताना आजीने मस्त अश्या काजूच्या बिया भाजायला ठेवलेल्या. पूर्वी आजी काजूच्या बिया भाजण्यासाठी शेतात जात असे, हे मला माहित होते आणि मी बघितले सुद्धा होते, पण अचानक घरा नजीकच्या एका ठिकाणी तिने काजूच्या बिया भाजायला सुरुवात केलेली, मी म्हटले आजी मी येऊ का मदतीला? आजीने मला तिथेच दम दिलेला कि लांब रहा ह्यापासून, उगाचच काजूसारखे द्रव्य ठिणगीसारखे लगेच उडाले तर... पण मी माझा हट्ट काय सोडला नाही आणि आजीचे वय सुद्धा झाले आहे. सोबत आठवण म्हणून एक-दोन छायाचित्रही टिपले. त्यानंतर भाजलेले काजू थंड झाल्यावर फोडताना आजीच्या हाताला जो काळपट रंग चढायचा, तो काय मग हप्ताभर पूर्णपणे जायायचा नाही. शेवटी काजुतले द्रव्य हे भाजल्यानंतर फोडतानाही लागतेच आणि ह्या गोष्टी साठी मदत करायला कोणी न सांगता, मी अगदी जायायचोच! महिनाभर काय सुट्टी घेतलेली असायची आणि माझे हात काळपट पडतील याची काय फिकीर नव्हती. त्यामुळे पूर्णतः गावकरी बनून राहणे मी पसंत करत असे, नाहीतर गावची मज्जा कशी लुटता येणार?

रानवाटेच्या फिरतीवर असताना मी आणि गावकरी बंधू खास काजू गोळा करण्यासाठी निघालेलो. त्याने मोठी टोपली पकडलेली, तर मी काटा पकडलेला. काटा म्हणजे उंच झाडावर असलेले काजू काढण्यासाठी तयार केलेले साधन, जे हलक्या बांबूला वर टोकावर ‘व्ही’ आकाराचे उलटे करून बांधत असत व ते घेऊन मी काजू काढावयास सुरुवात केली. खाली चार-पाच चादरींचाही पसारा केलेला, जेणेकरून त्यांना मार न लागता ते खाण्यास योग्य ठरेल. असे चालू असताना एक मात्र कोवळे काजू माझ्या कपाळावर वर बघता पडले व त्यातील द्रव्य माझ्या उजव्या डोळ्यात गेले. फार आणि बेफान माझे डोळे झोंबत राहिलेले. इतके ते झोंबलेले कि मसाला जाण्याहूनही अधिक. बाप रे! माझा सोबतीचा सुद्धा सावळागोंधळ झालेला कि आत्ता काय करावं? डोळ्यातून निघणाऱ्या पाण्यासोबत ते द्रव्य कमी झाले व झोंबायचेही, घरी जाऊन गप्पपणे झोपून गेलो कोणालाही न सांगता. संध्याकाळी उठल्यावर पहिले आरशात बघितले कि उजव्या डोळ्याने दिसतंय न बरोबर... काय अजून जास्त दुखापत तर झाली नाही ना... पण सुदैवाने तसे काही झाले नव्हते. तरीसुद्धा एक मात्र निश्चित झालेले, डोळ्याच्या सभोवताली द्रव्य पसरल्याने, काळपट पणाचा थर साचून राहिलेला, तो पण गेला काही दिवसांनी आणि घरच्यांचा ओरडा पडलेला ती एक वेगळी गोष्ट. पण ह्या प्रसंगातून डोळ्यासाठी सुदैवाने मात्र बचावलो.
काजूची भाजी खायायच्या अगोदर, नुसतेच कोवळे शिजवलेले काजू खायायची मज्जा एकदम झकासच!

--/ चंद्रशेखर सावंत