मला
एकदा अक्षय चा फोन आला आणि म्हणाला, आपल्याला
येत्या शनिवारी नाशिक येथे असणाऱ्या हरिहर ला जायायचे आहे. बोललो त्याला, जाऊया त्यात काय. व येणाऱ्या शनिवारी म्हणजेच ०७/१२/१९ या दिवशी आम्ही
रात्री नाशिक येथे निघण्यासाठी सज्ज झालो. शनिवार च्या दिवशी घाई घाई मधून निघताना
आम्ही एक्स्प्रेस ने जायायचे ठरवले. दादर पर्यंत मुंबई ची
लाईफ लाईन म्हणून ओळखणाऱ्या लोकल चा प्रवास व पुढे आम्ही नाशिक रोड वरून जाणारी 'अमृतसर एक्स्प्रेस' पकडली,
आत्ता जनरल डब्याचा प्रवास कसा असतो हे मला काय विशेष सांगायला नको. साधारण सकाळी
०३.४० च्या आसपास आम्ही नाशिक रोड ला पोहोचलो, पण पुढचा
मार्ग कोणालाच माहीत नव्हता. मी मागे एकदा म्हणजे एप्रिल २०१७ मध्ये खास हरिहर
साठी गेलेलो तो म्हणजे कसारा मार्गे पण तो हरिहर साथीचा पहिला प्रवास माझा वेळे
अभावी पूर्ण होऊ शकला नाही. त्याची खंत मला अजूनही जाणवते. तेव्हा पासून गडावर
जाण्यासाठी तरी कितीही दिवसभराच्या घाई घाई मध्ये असलो तरी निघणार व ठरलेल्या
वेळेनुसार, सुरवातीला भेटावयाच्या ठिकाणी पोहोचणार.
सकाळी
नाशिक रोड ला बाहेर पडताच चहाचे ५-६ स्टॉल्स दिसले. त्यातल्याच एका स्टॉल वर
सर्वजण गेलो. पण आमचा चहा विक्रेता हा विशेष होता. चहा बनवताना मोठ्या आवाजात व
सुरात 'घ्या चाय गरम.. चाय गरम, सुपर
स्पेशल गरमा गरम... हाहाहा... हे मात्र
आम्हा सर्वांना ताजेतवाने होण्यासाठी चहासोबत मिळालेली ‘कॉम्लिमेंटरी’ होती असे म्हणायला काय हरकत नाही. शेवटी त्याच्याही धंद्या निमित्त
माणसांना आकर्षित करून घेणं हे त्याचं कर्तव्य होतं. चहापान वैगरे झाल्यावर,
पुढे आत्ता जायायचे कसे? हा मात्र मोठा प्रश्न
होता. मी एका व्यक्तीला विचारले तिथे, हरिहर गडावर
जाण्यासाठी गाड्या कोणकोणत्या उपलब्ध असणार आहेत? आत्ता
त्यांच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया बघूनच मला कळून आलेले, येथे
काय जास्त वेळ घालवण्यात अर्थ नाही कारण हरिहर हा शब्दच त्या व्यक्ती साठी नवीन
होता. सरळ समोर असलेल्या एस. टी. स्थानकामध्ये मध्ये गेलो व एक 'पंचवटी भोग' नावाची स्थानिक फेरा मारणारी बस लागलेली,
लगेचच त्या बस चालकांना विचारले. मास्तर, हरिहर
गडावर जाण्यासाठी कुठची बस आहे आत्ता?
मास्तर म्हणाले, तुम्ही एक काम करा सीबीएस
रोड ला चला तिथून तुम्हाला गाड्या मिळतील. लगेच मित्रांना बोलवून म्हणजेच ७ जणं
आम्ही बस मध्ये आलो, पुढे ५ ला सीबीएस च्या डेपो मध्ये येताच
तिथल्या प्रवासी संपर्क केंद्र मध्ये विचारताच कळले, की त्या
ठिकाणी जाणारी त्रंब्यक साठी ५ ची बस नुकतीच निघाली. म्हणजे आमच्यासाठी हे आत्ता
दुर्दैवच झाले. दुसरी बस तासाभरात येणार होती व ती सुद्धा त्रंब्यक पर्यंतच पण
पुढे काय? पुढे जाण्यासाठी गाड्यांची सोय असेल का नाही?
यासाठी आम्ही ओला, ऊबर किंवा मिळेल ती खाजगी
गाडी बघून निघायचे असे ठरवले, पण त्यात सुद्धा गाडी लगेचच
मिळत नव्हती. म्हणून आम्ही ऑटो करायची ठरवले पण ऑटो वाला ७ जणं घेऊन बसवणार तरी
कुठे? ही मोठी पंचायत. पण ह्याचं उत्तर त्यानेच आम्हाला
दिलं. त्याने ५ जणांना मागे बसायला सांगितले. त्यात रोशन, वैभव,
सौरभ, दर्शन आणि प्रसाद व पुढे एका बाजूला मी
तर दुसऱ्या बाजूला अक्षय बसलेला. ५ मिनिटांवर असणाऱ्या पेट्रोल पंप पर्यंत प्रवास
व्यवस्थित झाला. पुढे ह्या प्रवासाचा अक्षरशः वैताग आलेला. तरी पण जायायचे होते ना,
मग तिथे 'नो आर्ग्युमेंट'. हे सर्व फक्त ध्यानात होतं व हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून दिसून येत
होते. ऑटोवाल्या काकांबरोबर गप्पागोष्टी करत प्रवास चालू होता. त्यांच्या ऑटो
चालवण्याच्या अंदाज वरून आम्हाला कळून येत होते की आपण कुठे तरी सकाळ सकाळी फसलोय.
फक्त ४०-५० च्या गतीने ऑटो चालवली तर कसं काय व्हायचं? वरून
त्यात गती रोधक आले तर अगोदरच ३-४ मीटर ते ब्रेक मारायचे, ह्या
सर्व घटना पाहून खरोखरच आम्हाला वैताग आलेला. शेवटी पुढे बसलेले अक्षय व मी
म्हणालो काका द्या आमच्याकडे गाडी! तुम्ही फक्त बसा. तेवढ्यातच बाजूने एक भरघाव
वेगात एस. टी. गेली हे बघून आम्ही अजून चिंतेत पडलो. ऑटोवाल्या काकांची बडबड चालू
होती पण नंतर आम्हाला झोपेच्या झपक्या यायायला लागलेल्या व नाशिक ची थंडी खूप
झोंबत होती. त्रंब्यक च्या पुढे आल्यावर ऑटोवाल्या काकांबरोबर आमचे पटेनासे झाले.
कारण त्याला कारणच तसे आहे. सुरवातीलाच आम्ही Google Map च्या साहाय्याने सांगितले सुद्धा,
त्रंब्यक च्या पुढे १४ एवढे किमी. अंतर आहे ते आम्ही तुम्हाला Google
Map वरून दाखवू व त्यांनां
तेव्हा हे मान्य होते. त्रंब्यक च्या पुढे आल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून आम्हाला
जाणवलेले हे आत्ता नाटकं करणार म्हणून व शेवटी तेच झाले. कशापायी तुम्ही मला इथं
आणलंत.. इथं वाघ येतो, सिंह येतो.. कशाला सकाळ सकाळी डोकं
खराब करू लागल्यात.. इत्या. तरी मात्र सौरभ पाठीमागे Google Map लाऊनच बसलेला. पुढे काही अंतरावर म्हणजेच जव्हार मार्गाने जात असताना
अंबोली च्या फाटका वर आम्ही उतरलो. परत त्याची तिथे रक्कम मागणी जास्त झाली. आम्ही
शब्दाला शब्द न वाढवता ते सुद्धा दिले. असो.. हे सर्व होत राहतं त्यामुळे त्याचे
काय जास्त मनाला वाटले नाही. प्रत्येक प्रवास हा वेगळाच असतो व माझ्यामते तो
असावाच! थंडी इतकी होती खिशातून हात बाहेर यायायला मागत नव्हते. खिशातून फोन बाहेर
काढायचा म्हटलं तर हात बाहेर यायला मागत नव्हते, पुढे एक
गृहस्थ समोर आला व चहा साठी विचारू लागला, व्यवस्थित
ताजेतवाने होण्यासाठी चहा शिवाय आम्हाला काय पर्याय नव्हता. म्हणून रस्त्या लगतंच
असणाऱ्या त्याच्या घरी तो घेऊन गेला. चहा पिताच, चहाचे पैसे
देऊ नका! असे सतत तो म्हणत होता पण इतक्या थंडीत आम्हाला चहासाठी समोरून येणारा
व्यक्ती म्हणून त्याच्या मुलाच्या हातात काही रक्कम ठेवली. पुढे मार्गस्थ होत होत
सौरभ च्या दृष्टिक्षेपास येणारे बरेच आडवे रस्ते, शेतातून
निघणारे रस्ते याचा अंदाज घेऊन आम्ही सर केले. त्यामुळे वेळ थोडफार का होईना पण
वाचला. अंबोली ते हर्षेवाडी १० किमी चे अंतर मस्त गप्पा मारत व निसर्गाचा आनंद घेत
आम्ही हर्षेवाडी पर्यंत पोहोचलो हे आम्हाला कळले सुद्धा नाही. हर्षे वाडी लागताच
पाऊण तास तरी तिथे आम्ही आराम केला व न्याहरी साठी तेथील असलेल्या घरगुती खानावळी
मध्ये कांदापोह्यांची मागणी केलेली म्हणून ते खाऊन आम्ही गड चढण्याचा दिशेला
मार्गस्थ झालो.
गडाच्या
दिशेने मार्गस्थ होत असताना सुरवातीला नयनरम्य पाण्याचा बांध दिसला, गड चढत असतानाच निसर्गमय वातावरणाचा आस्वाद घेण्यास आम्हाला प्रचंड आनंद
होत होता. एक तासाभरात आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वार जेथून स्पष्ट दिसून येतो
अश्या ठिकाणी पोहोचलो व मनाला एक दिलखुलास आनंद तर मिळालेलाच. पण तेवढी थोडीफार
शंका सुद्धा भासू लागली. हा गड आपण सर करू का नाही ते. पण एकदा ठरवले माथ्यापर्यंत
जायायचे, का मग जायायचेच! वाटेत मिळणारे लिंबूपाणी व वैभव ने
आणलेलं रियो हे ह्या सर्वाचा आनंद घेत आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्याची सुरुवात
जेथून होते तेथे पायथ्या लगतच आम्ही बसून पाहिले पायऱ्यांचे निरीक्षण केले ८०
अंशातला थरार, पहिलं तेथे भेटलेल्या शेपूट वाल्या मित्रासोबत
पाहून घेतला व एकदा मार्गी लागल्यानंतर पायऱ्यांवर पाय ठेवल्यानंतर काहीच वाटले
नाही.
सौरभ
ने घेतलेल्या सेल्फी मध्ये संपूर्ण समूह.
हर्षवाडी
मध्ये भेटलेला कोकरू.
१,१२० मीटर उंचीचा हरिहर
ओळखला जातो, ते येथील विशेष पायऱ्यांमुळेच. एक आधार म्हणून प्रत्येक पायरी मध्ये
खोबण्या आहेत, त्यामुळे चढाई व उतरते वेळीस आधार नक्कीच
मिळतो. माहितीनुसार हा हरिहर किल्ला अहमनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी
१६३६ साली त्याचाच जवळपास असलेल्या त्रंब्यक गडासोबत तोही गड जिंकून घेतला. १८१८
मध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. कातळात कोरलेल्या
पायऱ्या, पुढे चालून गेल्यावर डावीकडून नजरेस पडणारी वाट हे
सर्व अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. गडाच्या मुख्य द्वारामधून प्रवेश केल्यावर समोरच
शेंदूर लावलेला गणपती नजरेस पडतो. तिथे थोडीफार बसण्यासाठी मोकळी जागा आहे. तिथे
थोडा आराम वैगरे करून आम्ही पुढे निघताच एक डाव्या बाजूला निसर्गाच्या मोहात
टाकणारं दृश्य नजरेस पडते व परत जरा पुढे आल्यावर पूर्णतः ८५ अंशातली चढाई व ती
सुद्धा चढाई मध्येच वळण घेतलेली वाट आहे. तेथून दिसणारी खोल दरी म्हणजे
पायऱ्यांच्या खोबणी मधील हात नाही काढून देत. हा असा थरारी प्रवास झाल्यावर पुढे
सरताच हनुमानाचे मंदिर व विशेष म्हणजे हा हनुमान मिश्या असलेला आहे. शेजारीच
उघड्यावर शिवलिंग व नंदी आहे. समोरच तलाव
आहे पण हे पाणी पिण्यायोग्य नाही. सभोवतालच्या परिसरात ७ जोडटाके नजरेस येतात.
ह्यातील पाणी मी माझ्याकडे असलेल्या पिणाच्या बाटली मध्ये घेऊन टाळू थंड
करण्यासाठी बाजूला जाऊन माझ्या टाळूवर स्वतःच ओतत राहिलो व एकदम थंडावा मिळू
लागला. एवढं सर्व होऊन सुद्धा वैभव म्हणाला, चला अजुन समोर
जाऊन येऊ अजुन एक शेवटचा टोक ५०-६० फुटांचा बाकी आहे. सर्व जण उन्हात थकलेले
असल्यामुळे इतर कोण तयारही होत नव्हते. मग वैभव मला बोल ला चल शेखर आपण जाऊन येऊ.
कदाचित त्याच्यामुळेच नी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचू शकलो. अन्यथा ते ठिकाण माझं
राहून गेले असते आणि मनाला तेवढीच खंत वाटत राहिली असती की किल्ल्यावरील सर्वात
उंच जागा राहून गेली. गडाच्या माथ्यावरुन समोरचे मोहवणारे दृश्य तेथून पूर्वेकडे
असलेले त्रंब्यक डोंगररांग, दक्षिणेला वैतरणा तलावाच्या
येथील उभे असलेले कावनाई व त्रिंगल वाडी किल्ल्यांचे डोंगर फार आकर्षित करून
टाकतात तर उत्तरेला वाघेरा किल्ला दृष्टीक्षेपात येतो. येथून खाली उतरल्यावर
घुमटाकार माथा असलेली दगडी कोठी नजरेस पडते. तेथून दिसणारा ब्रह्मा डोंगर फार
सुंदर दिसतो. ह्या सर्वांचे दर्शन घेत तिथून परतीच्या मार्गावर येत असतानाच वाटेत
आमच्या कडे नजर लाऊन बसलेले आमचे साथीदार भेटले व एक मज्जा म्हणून सर्व जण टाळ्या
वाजवू लागले. आत्ता ही एक कल्पना कोणाची होती हे मला अजुन कळलेली नाही. पुढे उतरते
वेळी फोटोसेशन व पाठीला आराम मिळावा म्हणून वाटेत आडवे सुद्धा झालो. त्यात अक्षय तर
सावलीचा आधार घेत मनापासून मस्त झोप घेण्याचा प्रयत्न करत होता. कदाचित आरामाची
खूप गरज असावी त्याला त्यावेळेला. पुढे पुन्हा खाली आल्यावर खानावळी च्या ठिकाणी थोडे फ्रेश होऊन, आम्ही परतीच्या प्रवासासाठी चंदर म्हणून असणाऱ्या एका बोलेरो मालकाला फोन
केला. ह्याचा संपर्क आम्ही खानावळी मधूनच घेतलेला. त्यांना सांगितले आम्हाला
त्रंब्यक पर्यंत घेऊन चला, पुढे कसं काय मुंबई ला पोहोचायचे
त्याचं गाडीत बसल्यावर विचार करू. शेवटी सरकारी गाड्यांचा आधार घेत आम्ही मुंबई
मध्ये राहत्या घरी, रात्री ९ च्या आसपास पोहोचलो. अश्याप्रकारे
हरिहर गड हा आमच्या साठी एक विशेष प्रवास अनुभव देणारा राहिला पण हरिहर गड मनाला
खूप भावला.
या
हरिहर च्या प्रवासात एकमेकांना साथ देणारे सर्वच मित्र अफलातून होते व आहेत.
गडावर
असलेले मारुती रायाचे मंदिर
गडावरील
तलाव व सोबतच शिवलिंग तसेच नंदीचे दर्शन.
--/चंद्रशेखर सावंत