रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

प्रथम तुला वंदितो...

 




  

आपल्या हिंदू धर्मात श्री गणेशाला फार महत्त्वाचे स्थान आहे. सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन केले जाते तसेच ६४ कला असलेल्या अधिपती गणरायाला विद्येचे दैवत मानले जाते.

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, राजस्थान व गुजरात या ठिकाणी व तसेच भारताच्या बाहेर स्थलांतरित झालेले आपले भारतीय परदेशात सुद्धा हा सण मोठ्या थाटामाटात अगदी मनापासून व आवर्जून साजरा करतात. महाराष्ट्रातले कोकणी माणसे तर न चुकता दरवर्षी गौरी-गणपती मध्ये कोकणात हजेरी लावतात. भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर या काळात गणेश चतुर्थी येते. घराघरात गणपतीची लहान मूर्ती तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या मुर्त्या आणून अगदी मनोभावे त्याची पूजा सर्व मंडळी करतात.

या गणेशोत्सव काळात गणराया समोर भक्तिभावाने अथर्वशीर्ष व रोज सकाळी व रात्री त्याच्यापुढे आरती म्हटली जाते तसेच मोदकाचा किंवा लाडूचा प्रसाद दिला जातो. काहींच्या घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी दिड, पाच, गौरी - गणपती विसर्जन, सात तसेच अकरा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला मूर्तीचे नदीत, तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते.

१८९२ साली गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरवात केली. पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात जनजागृती निर्माण व्हावी हा हेतु त्यामागे होता. जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण आदरणीय लोकमान्य टिळकांनी त्याला अकरा दिवस चालणाऱ्या सामाजिक उत्सवाचे रूप दिले. या उत्सवाच्या निमित्ताने भारतातील जनता एकवटेल. त्यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांच्या रुपाने तिच्यात जनजागृती निर्माण करता येईल. आपली संस्कृती आणि धर्म याबाबत प्रत्येक नागरिकांच्या मनात एक अस्मिता जागृत होईल अशी ही भावना लोकमान्य टिळकांच्या मनात होती व सर्व भारतीय लोकांनी आपापसामधील भेद सोडून एकत्र यावे ही लोकमान्य टिळकांची मुख्य इच्छा होती.

आजच्या परिस्थितीत लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या या गणेशोत्सोवात किती गणेशोत्सव मंडळांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आठवण येत असेल? असा प्रश्न जर समोर आला तर फार क्वचित सार्वजनिक मंडळे समोर येतील. लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवातून समाजप्रबोधन व्हावे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. तसेच त्यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही गोष्ट अगदी खरी. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी तरुण पिढींमध्ये राष्ट्रप्रेम जागृत केलं. त्यानुसार काही सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. कलाकारी असलेल्या व्यक्तींच्या कलागुणांना वाव देऊन, सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर पडेल असे उपक्रम राबविले जात असत व आजही हे उपक्रम राबविले जात आहेत. सार्वजनिक मंडळे या काळात आकर्षक देखावे उभारतात तसेच चलचित्र उभारून यात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक एकोपा जपासावा यासाठी देखावे उभारतात. वक्त्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून, व्याखानमाला आयोजित केल्या जात असत. आजही ही प्रथा चालू ठेवणारी गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्या अनुभवाने मार्गदर्शनातून नवीन पिढीला योग्य दिशा मिळू शकेल. पर्यावरणाला त्रासदायक असणाऱ्यांचा वापर कमी केला पाहिजे. अशा पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा झाला तरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली जाईल.

दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात राजेशाही थाटात येणारा व राजेशाही थाटातच विसर्जनाला निघणारा आपला गणपती बाप्पा ह्या २०२० साली कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासकीय नियमावलीनुसार आला. कुठेही काय पर्यावरणाला त्रास होणार नाही अश्या स्वरूपात त्याचे आगमन व विसर्जन होणार. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे जर आपण बघत गेलो तर अतिशय योग्य आहे. तसेच आपल्या दृष्टिकोनातून सुद्धा कारण आपण कोविड १९ संसर्गापासून सार्वजनिक अंतराचे भान जपण्यास भाग पडू, यामुळे आपण जर का स्वतः व्यवस्थित राहिलो तर पुढच्या वर्षी उत्साहाने व भक्तिभावाने गणेशोत्सव पुन्हा साजरा करू शकतो.

भाद्रपद व माघ महिन्याची शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात. माहितीप्रमाणे गणेश चतुर्थीची प्रचलित कथा अशी आहे की एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप पाहिल्याने उंदिर भयाने कापू लागला. यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. म्हणून गणपतीने तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही असा चंद्राला शाप दिला.

शिवपुराणमधील माहितीनुसार पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी भगवान शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून आत प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित झाली. शेवटी माता पार्वतीने सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती तयार केली. या पुत्रास तिने स्वतःचा रक्षणकर्ता म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार बालकास दारी नेमून पार्वती स्नानास गेली व काही वेळेतच भगवान शंकर तेथे उपस्थित झाले. बालकाने शंकरास अडवले. पहिल्यांदा पहिल्यांदा या बालकासोबत त्यांचा वाद व युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही बातमी ऐकून पार्वतीने रुद्र अवतार धारण करून सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी तिला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनः जन्माची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. शंकरांनी होकार भरला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी देवगणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण असलेल्या पैकी एक हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने या बालकास जिवंत केले व शिवशंकरानी यास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा बालक प्रथम पूज्य झाला.

गणपती हा महाभारताचा लेखनिक होता. गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश व तसेच प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव यास आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. वक्रतुण्ड म्हणजे ज्याचे तोंड वक्र आहे असा तो. गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. माहितीनुसार भगवान परशुराम जेव्हा कैलास पर्वतावर निघत होते तेव्हा असुर परशूरामांच्या सावली मध्ये वेश धारण करून परशुरामा बरोबर कैलास पर्वतावर प्रवेश करत होता, हे वेळीच श्रीगणेशाने ओळखले व भगवान परशुरामांची वाट अडवून राहिला, गणरायाचे वाट अडवल्यामुळे रागाच्या भरात परशुरामाने हातात असलेल्या शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला व त्यात त्याच्या एका दाताला शस्त्र लागताच तुटून खाली पडला तेव्हापासून त्याचे एकदंत नाव पडले. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपती व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाव प्राप्त झाले. अश्या बऱ्याच कथा आपल्याला वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे किंवा पुस्तकी वाचनातून माहीत पडते.

मुंबईत राहत असलेल्या ठिकाणी गणरायाच्या समोर सहज बसलो होतो गणरायाचे मोहक रूप बघून सतत त्याच्याकडे बघत व तिथेच त्याच्या बरोबर रहावेसे वाटते. त्याच्या सुंदर रुपात भारावून जाताना बाप्पा काहीतरी बोलतोय असे मला भासू लागले. मग अशी मिळालेली सुवर्णसंधी आपण सोडायची कशाला? त्यावर त्याने सांगितले की आजकाल ह्या तुमच्या पिढी मध्ये मज्जा करण्याची वेगळीच पद्धत आहे. त्या मोठ्या ‘दूरध्वनिक्षेपक’ (D.J.) मध्ये तर कानाला दडा जातो अशा कर्कश आवाजात त्याचे ध्वनी वाढवून ठेवतात. ह्यामुळे पर्यावरणातील इतर सजीवांना सुद्धा त्रास होतो, काही प्राणी ‘कर्ण-बधिर’ सुद्धा होतात, गेल्या २-३ वर्षांपासून ह्यावर बंदी घातली म्हणून ठीक आहे. ‘P.O.P’ च्या मुर्त्यांमुळे पर्यावरणाचे खूप प्रमाणात व जलचर सजीवांची सुद्धा खूप हानी होते. तसेच जागतिक हवामानावर सुद्धा याचा परिणाम होतो. याची तुम्हाला कल्पना आहे का? पण बाप्पाची नाराजी वाढू नये म्हणून मी नंतर जरा मज्जेचा विषय चर्चेत आणला. त्याला म्हणालो की तुला मागील वर्षी झालेल्या ‘भजन-नाट्य’ तसेच ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ या मध्ये कशी मजा आली? यावर बाप्पा लगेचच खुश झाला, आणि म्हणाला की मज्जा तर आलीच, पण पुढच्या वेळी आणि कायमस्वरूपी हीच परंपरा राहूदे, हे ऐकून मला सुद्धा खूप बरे वाटले, मी त्याला उत्तेजितपणाने म्हणालो नक्कीच! असाच गणेशोत्सव मनापासून दरवर्षी अगदी पर्यावरणाला त्रास होणार नाही तसेच भक्तिभावाने साजरा होऊदे ह्याच माझ्या इच्छा असतात. अशाप्रकारे भावनिक संभाषण झाल्यावर आत्ता अनंत चतुर्थीला आपल्या लाडक्या गणरायाची निरोप घेण्याची वेळ येईल व दरवर्षीप्रमाणेच गणराया नजर चुकवून जाताना दिसणार, कदाचित आत्ता आपल्या भेटीस एक वर्षाचा अवकाश असेल म्हणून कदाचित तोही आपल्यापेक्षा नाराज होईल. ह्या सर्व तेथे भावना व्यक्त होत होत्या. विशेष म्हणजे कोविड १९ च्या कालावधीत साजरा झालेला गणेशोत्सव, सकारात्मक विचारांसाठी खूप काही प्रेरणा देऊन गेला.

विघ्नांचा नियंत्रक असलेल्या श्री गणरायाच्या चरणी सर्व त्याच्या भक्तांकडून प्रार्थना असेल की कोविड-१९ हा रोग संपूर्ण जगातून पूर्णतः नष्ट होवो व पुढचे सर्व दिवस आनंदी जावो.

 

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...

 

--/ चंद्रशेखर सावंत

२ टिप्पण्या: