गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

अलविदा २०२०

चालु झालेलं नवीन वर्ष आणि अचानक मार्च महिन्यापासून आलेली कोविड १९ ची संक्रमकता ते २०२० च्या अखेरपर्यंत व पुढे हे सर्व कधी संपेल ह्याचं उत्तर अद्याप आलेलं नाही. ह्या सर्वात अफाट गोष्टी शिकण्यासारख्या मिळाल्या.. काळ आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टींचा ह्या वर्षात चांगलाच अभ्यास झाला जो आयुष्याच्या शेवट पर्यंत कामी येईल, पण खरंच असं मनापासून वाटतं की २०२० ह्या वर्षासारखा अजून कोणता वर्ष परत कधी आयुष्यात नकोचं! कारण काळ व वेळ ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास सहज सहज स्पष्ट झाला. खरंतर हे होणं गरजेचचं होतं.. आपल्या सर्वांवरच असलेल्या कोविड १९ च्या संक्रमकतेनुसार काही उद्भवलेल्या प्रसंगावर, मी स्वतः वास्तविक प्रक्रियेवर किती ह्यावर स्पष्ट होतोय ह्याचा अंदाज माझ्याकडून मलाच स्पष्ट झाला.. हे सर्व स्पष्ट झालं हिच मोठी बाब आहे. असं म्हणतात इतरांशी आपल्याला काय घेणं देणं... पण ह्या कोविड १९ च्या परिस्थितीत इतरांच्या वाट्याला जेव्हा दुखः येतात तेव्हा त्यांच्याकडचीचं माणसं जेव्हा वेळेनुसार पाठ फिरवतात तेव्हा ते फक्त बघून सुद्धा फार वाईट वाटतं. इथे सरळ सरळ रंगबदली सरडा म्हणून सहजपणे स्पष्ट होतो.

ह्या वर्षात मी एक नाराजीने विशेष म्हणून इथे उल्लेख करेन की गिर्यारोहण क्षेत्राकडे माझे ह्या वर्षात कमी पाऊल वळले गेले, गिर्यारोहण क्षेत्रातले माझे सर्व अफाट जिवलग मित्रपरिवार दुरावले गेले, ह्याचा प्रचंड मनस्ताप मला सहन करावा लागला, ह्या मनस्तापामुळे माझी प्रत्यक्षात व्यक्त होण्याची इच्छाशक्ती माझ्याकडून नाहीशी झाली. काही बाबींमुळे तर मनमोकळे होण्यासाठी लोणावळा येथे काही वेळा मनशांती साठी जावे लागले, पण हे सर्व व्यर्थ आहे कारण जिथे माझे ट्रेकर्स बांधव नाहीत तिथे तिथे मला स्वर्ग मिळणे कठीणच! गिर्यारोहण क्षेत्रातल्या माझ्या सर्व बंधू भगिनींवर हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींचा असा आशीर्वाद असल्यामुळे, त्यांच्याकडे एक मोठ्या मनाची समंजसता असल्यामुळे ते मला ओळखू शकतील ह्यात तिळमात्र शंका नाही. ह्यापुढे मी अजून काही म्हणू शकत नाही. तरी सुद्धा मनावर एक प्रश्न येतोच येतो की एवढ्यावरच आपण हरायचे का? तर उत्तर सरळ सरळ नाही येतं... आयुष्य आहे शेवटी चालायचचं!

मला काही जणांचं सांगणं असतं की काय नुसतं तुम्ही प्रत्येक गडांवर भेट देत असता त्या सर्वांना माझं सांगणं असेल की जेवढे चढ उतार आम्हाला ट्रेक मध्ये येतात ना.. तेवढे आम्ही दैनंदिन आयुष्यात बघतो व त्यांना पार कसे करायचे. ह्याचं गुपित त्या माझ्या छत्रपती शिवरायांच्या अस्मितेवर आहे.. 

ह्या सर्वांना तोंड देण्याचा अभ्यास व आमच्या नसानसात शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीतून चढाई करताना जेव्हा घामाच्या धारा निघतात तेव्हा शिवरायांचा सहवास आम्हाला लाभल्याचा पुरेपूर आनंद होतो.

आयुष्यात चढ उतार नाही आले मग ते आयुष्य कसलं? एक पारदर्शी स्वभावामुळे पहिल्या पासून कमावलेल्या व्यक्ती आहेत त्यांचा सहवास मला फोन द्वारे होत होताच पण प्रत्यक्षात भेट होणं व त्यांच्याशी मनमोकळे पणाने बोलणं हे सर्व ह्या वर्षात शक्य नाही झालं ह्याची खंत मला ह्या वर्ष अखेरीस खूप वाटते. असं सर्व असल्यामुळे व काही खाजगी कामात असल्यामुळे काही सवंगड्यांचे कॉल्स मला उचलता नाही आले. ह्याचा मला नंतर स्वतःलाच त्रास वाटू लागलेला..पण २०२० ह्या वर्षअखेरीस असं वाटत आहे की येणारा २०२१ हा वर्ष खूप आणि खूप काही सकारात्मक गोष्टी घडवून आणणार आहे. ही दूरदृष्टी ठेऊन नवीन वर्षात पदार्पण करण्यास मी सज्ज असून ही इच्छा शक्ती मनावर ठेऊन आत्ता नवीन वर्षाचं स्वागत करायला मी मनापासून तयार आहे..


येणाऱ्या २०२१ च्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.. 
 
--/ चंद्रशेखर सावंत