रविवार, ९ मे, २०२१

मातृवात्सल्य



सकाळी ८ चा अलार्म वाजतो काय आणि दैनंदिन व्यवहारासाठी माझ्या पुढील कार्यासाठी झटापटीने कार्य व्हावे यासाठी तिचा हातभार हा फार मोलाचा ठरतो.

अलार्म वाजल्यानंतर तिचा फक्त एक आवाज उपहार गृहातून येतो.

विकी..... उठ चल!!

पण ती जिथपर्यंत माझा दरवाजा खोलत नाही तिथपर्यंत मी कसला उठतोय...
तिचं ५-६ वेळा मला बोलणं होत नाही तिथपर्यंत बेड काय मला सोडत नाही.. शेवटी मग ८.१० च्या आसपास बेडरूम चा दरवाजा खोलला का समजून जायचं आत्ता हळूच फटका पडणार आहे. या भीतीने, ती दरवाजा उघडायला आणि मी उठायला अशी वेळ जुळून येते. कारण तिच्या हळूच्या फटक्यापेक्षा स्वतःहून उठलेलं चांगलं... मग उठल्यानंतर डायरेक्ट कुठे न जाता माझा हात पहिलं माझ्या खाजगी कपाटामध्ये जातो की आज मी कोणता शर्ट घालू? असा विचार करत २-३ मिनिटं माझी कपाटाच्या समोरच जातात, मग असेल तो शर्ट काढून मी ईस्त्रीसाठी ईस्त्रीच्या टेबल वर काढून ठेवायचा व त्यानंतर मी अंघोळीसाठी निघतो. अंघोळ करून आल्यानंतर माझा जेवणासाठी असलेला डब्बा, माझ्या पाण्याची बाटली आणि माझा ईस्त्रीचा शर्ट हे १० मिनिटाच्या आत तयार करून हॉल मध्ये रेडी करून ठेवलेलं असतं.. लगेच ५ मिनिटांनी माझा सकाळचा नाश्ता सुद्धा हॉल मध्ये येतो. म्हणजे ह्या सर्वात माझी आई व्हर्टिकल लूक अप मारते हे मात्र खरं. ऑफीस मध्ये निघताना तिचा एकचं शब्द असतो. सोन्या, काळजीपूर्वक जा आणि काळजीपूर्वक ये.. घाई घाई असल्यामुळे त्या वाक्यास मी फक्त हा म्हणतो पण जर का कुठे बाहेर कोणत्या विचारांमध्ये असलो का हे वाक्य मला तिचं आठवतंच आठवतं.

बाहेरून घरी आल्यावर सुद्धा तेच
हात पाय धुवून झाल्यावर तिचं मला स्वतःहून सांगणं असतं की विकी तुला नाश्त्यासाठी काय आणून देऊ? कधी कधी तर न सांगताच समोर नाश्ता आलेला असतो.

आजपर्यंत कधी मी रात्रीच्या जेवणासाठी वेळेवर नाही जेवलो पण वेळ झाली की तिचं सारखं बोलणं असतंच असतं की चल जेऊन घे..

आत्ता कोव्हिड चे संक्रमण बाहेर पसरत चालले आहे म्हणून माझा रविवार हा घरी वेळ घालवून निघून जातो. नाहीतर कोव्हिड च्या आधी बहुतेक वेळा रविवारी मुंबईच्याच बाहेर असायचो आणि जर का घरी असलो तर संध्याकाळी मी घरातून निघताना एकच वाक्य तिचं असतं की तू रात्री येणार आहेस ना जेवायला?

हाहाहा, म्हणजे रविवार असला की माझं डिनर बाहेरच असतं हे तिला पण न सांगता माहीत असतं.

असंच सारखं प्रेम तिचं माझ्या शाळेच्या आयुष्यात पण होतं.. पण तेव्हाचा मी आणि आत्ताचा मी ह्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. हे मी माझ्या शाळेतील मित्र मंडळींच्या सांगण्यावरून सांगतोय.. हाहा..

एक माझी शाळेतली मैत्रीण व्हॉट्सॲप वर बोलत होती आणि आम्ही जुन्या आठवणींबद्दल बोलत होतो. बोलणं चालू असताना.. हळू हळू शाळेतल्या आठवणी निघू लागल्या.. मी बोललो सांग एखादा माझा शाळेतला किस्सा! किस्से तर खूप निघाले पण आई मला खूप कंटाळायची आणि म्हणायची.. हा बाबा इतकी मस्ती करतो ह्याचा मला अक्षरशः कंटाळा आला आहे, ह्याचं काय करू मी मलाच नाही समजत आहे.. म्हणजे इतकी मस्ती असताना सुद्धा मला तिने सांभाळलं.. हे विशेष!!

आई आहे तर जगातील सर्व सुख आहे. आई खरोखरच खूप वंदनीय आहे हे मात्र अगदी बरोबर आहे. खरं तर तिला सन्मान देण्यासाठी कुठला खास दिवस कशाला पाहिजे? ती तर दररोज खास असते या जगातल्या प्रत्येक मुलामुली साठी. आपल्या संपूर्ण कुटुंबाची ती काळजी घेते ,कष्ट करते, घरासाठी राब- राब राबते.

मातृदिन हे जागतिक पातळीवर साजरे केले जाते. बाहेरच्या देशात आईचे आभार मानण्याची ही एक पद्धत आहे. आईला काही भेट वस्तू देणे, तिच्या सोबतीने वेळ घालवणे इत्या. हा दिवस आपल्या आई वरचे प्रेम, तिची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु प्रश्न असा उद्भवतो की आपण आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करू शकतो का ? ती आपल्या कुटुंबासाठी झटत असते कष्ट करते तरीही कधी थकत नाही. तिच्या मनमिळाऊ व हसमुख स्वभावाने आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी खूप काही करत असते.




रक्षाबंधन च्या दिवशी अगदी हक्काने मला राखी बांधून बहिणीची कमतरता न भासू देणाऱ्या माझ्या आईला माझ्याकडून मानाचा मुजरा.

आज जागतिक मातृदिनानिमित्ताने बऱ्याच मित्रमंडळानी प्रत्येकाच्या आईचे छायाचित्र त्यांनी व्हॉट्सॲप वर ठेवले, मी ही ठेवले.. अगदी आनंदाने.. पण फक्त आजच तिचा दिवस का म्हणून? तिचा तर प्रत्येक दिवस असायला हवा..

मन असं पण बोलतोय की आईचा दिवस तर नसतोच पण प्रत्येक आपला दिवस आईमुळे असतो. या जगातील प्रत्येक मातृत्व लाभलेल्या आईला माझ्याकडून शुभेच्छा..

--/ चंद्रशेखर सावंत


२ टिप्पण्या:

  1. अतिशय सहज,सुंदर लेखन.मनाला भावून गेलं आणि शेवट तर एक चांगला संदेश देवून गेला. तुझ्या आईच हे मात्रृप्रेम सदैव तुझ्या सोबत राहो,तुला आनंद देत राहो.

    उत्तर द्याहटवा