काही प्रवास असे असतात की आयुष्याच्या शेवट पर्यंत लक्षात राहतात. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाणारे कळसूबाई शिखर. खरंतर ट्रेक म्हटलं की नियोजन नसून सुद्धा क्षणोक्षणी निघायचे बेत तयार होतात ती मज्जा म्हणजे त्या त्या वेळेलाच कळते. मला शुक्रवारी विनायक चा सकाळी फोन आला आणि म्हणाला की उद्या रात्री आपल्याला कळसूबाईला निघायचे आहे. सकाळी झोपेतून त्याला होकार दिला की निघू म्हणून. तर ठरल्याप्रमाणे शनिवारी म्हणजेच १४ जूनला रात्री मी, विनायक, जितेश, सोहेल, अखिलेश व अमित हे मालाड स्टेशन वरून दादरसाठी रवाना झाले. दादर वरून आम्ही 'अमृतसर एक्स्प्रेस' दिसताच ती ट्रेन फलाटावर लागल्यानंतर सुटेल या भीतीने पुढच्या दिशेला आम्ही लगेच चढलो पण नंतर आत गेल्यावर कळाले की हा डब्बा आर्मी चा आहे. डब्बा पूर्ण स्वच्छ व आर्मी मधील जवान त्यात होते. गिर्यारोहण चा समूह गप्पा गोष्टी व आठवणी शेयर करत आम्ही ३.३० च्या आसपास आम्ही इगतपुरी या स्थानकाच्या इथे पोहोचलो तिथे पोहोचताच आम्ही एस.टी. स्टँड गाठले व तिथे सकाळी ४ च्या आसपास नाष्टा पाणी वैगरे करून घेतले पण कसली भयाण शांतता व काळोख होता तिथे. तो एस.टी.स्टँड न वाटता एक खुले मैदान व एक व्यासपीठ असंच वाटत होतं तिथे. त्यात नाष्टापाणी झाल्यावर जरा एस. टी स्टँड वर पडायचे म्हटले तर तिथे थोडीफार भिती वाटायला लागली कारण आम्हाला तो विभाग नवीन होता. म्हणून आम्ही रस्त्याच्या कडेला दिवा असल्यामुळे तिथे येऊन बसलो. थोड्यावेळातच आमच्या डोळ्यावर झोप येऊ लागली व रस्त्यावर पाट टेकून आकाशात चांदण्याच्या छताखाली असलेला आनंद फार मनाला स्वच्छंदी करणारा होता पण काही वेळेतच अचानक तो दिवाही गेला व रस्त्यावरचे कुत्रे भुंकायला लागले हे सर्व बघून आमची झोपच उडाली म्हणून थोड्या वेळात लाईट येताच आम्ही जवळच्या ठिकाणी फेऱ्या मारायला सुरुवात केली. फेऱ्या मारताच जरा पुढे गेल्यावर एक आजी खाटेवरून उपडी पडून एकटक आमच्या समूहाकडे बघतच होती, हे असं दृश्य बघताच आम्हाला काय तिथे थांबावेसे वाटले नाही व परत एस.टी. स्टँड च्या इथेच आलो. सकाळी ०५.३० वाजता बारी या गावी जाणारी एस.टी. आम्हाला स्टँडला उभी असलेली मिळाली व बस मध्ये बसताच आम्ही थोडी झोप घेतली. बारी या गावी पोहोचताच मनाला एक विशिष्ट आनंद मिळू लागला की जे नाव आम्ही शाळेत असताना फक्त भूगोलात बघितलेले त्या नावाचं शिखर आम्ही सर करण्यास राजी झालो आहोत म्हणून. स्थानकाजवळ असलेल्याच खानावळी मध्ये आम्ही चहापान करून घेतला व पुढच्या दिशेला मार्गस्थ झालो. कळसूबाई सर करताना एक विशिष्ट आनंद मनाला भासवत होता. निसर्गाच्या कुशीत जगताना एक नवी उमंग आपल्याला साथ देत असते हे आपल्याला त्या ठिकाणी गेल्यावरच कळतं. मार्गस्थ होत असतानाच आम्हाला कळसूबाई चे मंदिर दिसले तिथे नमस्कार करून पुढेच्या चढाई श्रेणी साठी सज्ज झालो वाटेत निसर्ग मस्त ताजेतवाने झालेला व त्या सोबत आम्हाला सुद्धा अगदी चैतन्यमय वातावरण भरवून देत होता व सांगत होता की या तुमच्या स्वागतासाठी मी सज्ज आहे. निसर्ग समवेत फोटोसेशन वैगरे झाल्यानंतर आम्ही अजून वर वर जात होतो तस तसे आम्हाला धुक्याचा सहवास लाभत होता व स्वर्गात पोहोचल्याचा भास जाणवू लागला.
अक्षरशः डोक्यावर व दाढीवर सुद्धा दवबिंदू तयार झालेले इतक्या थंड प्रमाणात वर वातावरण होतं व तितकीच हवा सुद्धा. थोड्या अंतरावर आम्हाला कळसूबाईचा शेवटचा वरचा पॅच आला व तिथे सुद्धा अफाट हवा होती अक्षरशः कपडे फडफड नुसते वाऱ्याने उडत होते. तिथे थोडा तासभर घालवताच आम्ही वर असलेल्या मंदिरात कळसूबाई मातेचे दर्शन व परतीच्या दिशेला निघालो. खाली उतरताना लगेचच जलदगतीने पण सर्व काळजीपूर्वक आलो व पूर्ण खाली येताच पावसाने हजेरी लावली म्हणजे कळसूबाई यशस्वी पूर्ण झाला म्हणून पावसाने केलेले आमचे स्वागत, असे भासू लागले. पायथ्याशी पोहोचताना उतारा असल्यामुळे सरकत समोरच शेत असल्याने आम्ही अगदी लहान समजून त्या शेतात नाचू लागलो आणि शेतातली माती किती भुसभुशीत असते हे सर्वांना माहीतच असेल त्यामुळे अजुन मज्जा केली. पुढे बारी गावच्या दिशेला पोहोचताच चहापान करताच आम्ही एस.टी. ची वाट बघू लागलो पण एस.टी. काय अजुन येईना. ५.३० झाले तरी काय अजुन एस. टी येईना. शेवटी आम्हाला जीप मिळाली पण ती सुद्धा पूर्ण भरलेली म्हणून त्या जीप चालकानेच सांगितले की तुम्ही जीप च्या टपावर बसा.. व आम्ही सर्वजण बसलो सुद्धा व पुन्हा एकदा जीवाची मज्जा लुटून घेतली.. आयुष्यात आजपर्यंत खूप ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात फिरलो पण कळसूबाई चा पाहिलं गिर्यारोहण हे असं सर्व घडल्यामुळे हा प्रवास आयुष्याच्या शेवट पर्यंत लक्षात राहील.
आपलाच
--/🌝शेखर सावंत