सोमवार, १९ एप्रिल, २०२१

कोव्हिड - १९ आणि युद्धभूमी धारावी


महाराष्ट्रात कोव्हिडला सुरुवात झाल्यानंतर काही २-३ महिन्यांनी मुंबईतील धारावी येथे असलेली परिस्थिती फारच वाईट होत चाललेली. दिवसेंदिवस तिकडे कोव्हिडचे रुग्ण वाढत चाललेले, वृत्तपत्र व टिव्हीवर तिकडच्या सर्व माणसांचे हाल बघून डोक्यात सारखे विचार येत होते की हे प्रसंग आपल्यावर ओढावले तर आपले काय हाल होतील? फक्त रात्री न्यूज वर कोव्हिड रुग्णांचा एक सारांश घ्यायचा आणि नंतर झोपण्याचा प्रयत्न करायचं असं सर्व सुरवातीला व्हायचं. त्यावेळी सर्व काही ठप्प झालेलं, इमारतीच्या बाहेर जाण्यासाठी काय कोणाला परवानगी मिळत नव्हती. त्यावेळी इमारतीच्या खाली एक माझ्याकडून एक दैनंदिन कार्यासाठी मदत म्हणून, मी माझा काही वेळ देत होतो. त्याचवेळी मला माझा मित्र सुहृद याचा फोन आला आणि बोलला की शेखर चल आपण या ओढावलेल्या संकटावर एक माणुसकीच्या नात्याने आपण मदतकार्य करूया. कुठे तर धारावीमध्ये स्क्रिनिंग कार्यासाठी आपण निघुयात, तू मला तुझं लवकरच कळव. मी फक्त एकाच दिवसात माझा होकार कळवून दिला व लगेच सुहृद ने त्याच्या वरिष्ठांशी बोलून घेतले व आमच्या दोघांची उपलब्धता कळवली. ह्या सर्वात मी माझ्या आईबाबांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाच कळू न दिलेले होते कारण काय आहे शेवटी प्रत्येकाची विचार करण्याची पातळी ही वेगवेगळी असते आणि माझ्यामुळे इतर कोणाला झालेला त्रास हा मला तरी सहन नसता झाला. सुहृदने उपलब्धता दिल्यावर त्याच संध्याकाळी मालाड पश्चिम येथील साई पॅलेस ह्या हॉटेल मध्ये आमची ट्रेनिंग होऊन पुढच्या दिवसासाठी सज्ज झालो ह्या सर्वात विशेष आभार मानावे तर माझे सदैव आदरणीय असलेले CA श्री.श्रीकांतजी व. मराठे व माझ्यासाठी मित्रत्व तसेच प्रसंगी आईसारखं प्रेम देणारी श्रीम. अदिती श्री. मराठे यांच्या विषयी सांगू तितकं कमी असेल. स्क्रिनिंगच्या दिवशी श्रीकांत सर व अदिती काकी खास त्यांची गाडी घेऊन सुहृद व मला सोडण्यासाठी आलेले. आपण धारावी मध्ये जाणार त्यामुळे थोडेफार विचार माझ्या मनामध्ये घोळतच होते पण मराठे कुटुंबीय सोबत असल्यामुळे मी माझ्या भितीपणाला सावरू शकलो व जागोजागी पुढचा विचार करू शकलो. ह्या सर्वात मला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं एकच वाक्य आठवतं जे मला माझ्या श्रीकांत सरांनी आठवण करून दिलेलं ते म्हणजे
देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. ह्या वाक्याला समोर ठेऊन मी व सुहृदने हे सकारात्मक पाऊल उचलले, आमच्या व्यतिरिक्त तिथे सुद्धा असंख्य तरुणाई होती जी मुंबईच्या व मुंबईच्या बाहेरून येऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजसेवा करत होती. तिथे गेल्यानंतर आम्ही चिलखत म्हणून असलेले पी.पी.ई किट घातल्यानंतर मी एका समूहात व सुहृद एका समूहात अशी परिस्थिती झाल्यावर, आम्ही अश्या परिस्थितीत आमच्या समोर असलेल्या मोठ्या आव्हानाला सामोरं जाऊन पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. सर्व काही आमचं ठरल्याप्रमाणे झाल्यावर नंतर जेवण वैगरे झाल्यानंतर गाडीमध्ये आल्यावर मनाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद झालेला की आमच्या मदतीचा एक खारीचा वाटा या समाजासाठी अर्पण झाला. माझ्या समोर तर एकवेळ असा पण प्रश्न उपस्थित झालेला की इथून मी घरी व्यवस्थित जाईन की नाही पण जर घरी नाही गेलो तर समाजासाठी व राष्ट्रासाठी नक्कीच काहीतरी देऊन गेलो याचा एक प्रकारचा अभिमान चेहऱ्यावर फुलत राहिलेला असेल. आज हा दिवस आठवला व ह्याबद्दल मनाच्या वाटा मोकळ्या करून घेतल्या. खरंच श्री. श्रीकांत मराठे व कुटुंबीय यांचे मनापासून आभार..


राष्ट्रप्रथम!!!


--/चंद्रशेखर सावंत