एका विषयासंदर्भात मी फोर्ट रायडर्स च्या व्हॉट्सॲप समूहात एक मेसेज टाकला आणि तितक्यात मला कल्पेशचा पर्सनली मेसेज आला की उद्या काय कुठे बाहेर जाणार आहेस का? कल्पेशने सर्व मला सांगितलं काळदुर्ग च्या संदर्भात लगेच माझा होकार त्याला सांगून, कधी तो सकाळी ट्रेक साठी निघण्याचा दिवस येतोय असं झालेलं. संध्याकाळ पासून झालेली उत्सुकता ही काही मनाला शांत बसू देत नव्हती. रात्री जेवण झाल्यानंतर सकाळी ४.०० चा अलार्म लावला आणि झोपून गेलो.
ट्रेकच्या दिवशी म्हणजे १३ जून रोजी ठीक सकाळी ४.०० ला उठल्यानंतर डोक्यात विचार यायला सुरुवात झाली की सर्व व्यवस्थित होईल ना.. कारण खूप आत्ता मध्ये गॅप सुद्धा पडला आहे.. कोव्हिडमुळे बाहेरचं कसं वातावरण असेल? दुसऱ्या जिल्ह्यात जाताना तिकडचे काय निर्बंध असतील? आपण व्यवस्थित जाऊन येऊ शकतो ना? ह्या सर्वांचं विचार डोक्यामध्ये घोळत होतं. त्यातच माझी २० मिनिटं गेली, पण पुढे सकारात्मक विचार ठेऊन अंघोळ वैगरे झाल्यानंतर नाश्ता पाणी व चहा झाल्यावर कल्पेशला एकदा फोन केला व निघालो. आई तेवढं फक्त म्हणत होती सांभाळून जा आणि सांभाळून ये. सध्याच्या वातावरणाला अनुसरून बाहेर स्वतःची व सवांगड्यांची काळजी घेऊन रहा व नीट घरी ये. मालाड स्टेशनला पोहोचल्यावर कल्पेशचा फोन आला की आम्ही दादर वरून निघालो, बोरिवलीला पोहोच तू. लगेच मी तिकीट काढून बोरिवलीला पोहोचलो. ठरल्याप्रमाणे कल्पेश व त्याचे मित्रमंडळी मला बोरिवलीला भेटले व तिथून आम्ही पालघरच्या पुढील प्रवासासाठी सुरुवात केली. जाताना वाटेल लागणारी भाईंदर ची खाडी व विरार च्या पुढे लागणारी वैतरणा नदी ही मन मोहून घेत होती. एक वेगळ्या प्रकारचा मनाला सुखद आनंद मिळत होता. साधारण ७ च्या आसपास आम्ही पालघर स्टेशनला पोहोचल्यावर गरमागरम कांदापोहे, समोसे व नंतर मिळालेला ट्रेक साठीचं पहिलं समाधान म्हणजे मित्रांबरोबर उभा राहून पियालेला चहा. आहाहा... त्याचा आनंद आपल्याला तेव्हाच कळतो. पुढे बाघोबा खिंड पर्यंत पोहोचायला आम्ही रिक्षा पकडली व तिथे पोहोचताच कल्पेशला मयूर दादाचा फोन आलेला. आमच्या फोर्ट रायडर्स समूहातील मयूर दादा म्हणजे एक मोठ्या भावासारखा आधार असलेला व्यक्तिमत्व अगदी व्यवस्थित विचारपूस व काळजी घेण्यास सांगणारा आमचा लाडका दादा. नंतर खाली कुठेही वेळ न घालवता आम्ही लगेचच पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तिथे पाण्याच्या पंपाच्या येथेच चढाईला सुरुवात होते. सुरुवात झाल्यावर आम्हाला २०-२५ मिनिटातच थोडा दम लागायला सुरुवात झालेली. अक्षरशः घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या, हृदयाचे ठोके पण वाढू लागले होते आणि डोक्याच्या आतील ठोके वाढून पण ठन ठन आवाज येऊ लागला होता. तिथे थोडा वेळ आम्ही ब्रेक घेतला. कारण बऱ्याच महिन्यांनी आम्ही गिर्यारोहणासाठी निघालेलो त्यामुळे थकवा येणे साहजिकच होते. असं वाटतं होतं कधी पाऊस येतोय आणि कधी आम्ही पावसात भिजून आम्ही वर चढतोय ते. थोडं काही अंतर पार केल्यानंतर आम्हाला एक पठार दिसलं व परत तिथे आम्ही थोडा ब्रेक घेतला नारळवडी व इलेक्ट्रॉल पाणी घेऊन आम्ही थोड्याच वेळात तिथून निघालो. तेथील वनभ्रमण मनाला फार आकर्षक करून घेत होते. थोड्याच वेळात आम्हाला धुके दिसायला सुरुवात झाली व पुढे जाताच आम्हाला स्वर्गात गेल्याचा भास होत होता. हाहाहा.. भास कसला आम्ही खरोखरच स्वर्गात होतो की... वाटेत दिसणाऱ्या गोगलगायी सुद्धा मन आकर्षून घेत होत्या. आम्ही वरच्या शेवटच्या पॅचवर पोहोचल्यावर आम्हाला मनाला एक सुखद आनंद मिळू लागला व आमच्या सर्वांच्या सॅक एका ठिकाणी ठेऊन आम्ही निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला हरवून घेतले.
खरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणणे योग्य नाही, कारण गड असल्याची कोणतीही खूण या गडावर नाही. हे एक टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते. वरच्या एका ठिकाणी आम्ही थोडा निवांत वेळ घालवत प्रत्येकांनी आणलेला सुखा खाऊ एकत्र बसून निसर्गाच्या सानिध्यात करून खाऊन घेतला व थोड्याच वेळात परतीच्या प्रवासास सुरुवात केली. गडाच्या खाली खूप प्रमाणात माकडे आहेत, सर्व माकडे माणसाळलेली असल्याने त्यांना खाण्यासाठी काहीतरी घेऊन जावे, पण जरा सांभाळून कारण आपल्या बॅग मधील खाद्यपदार्थांवर त्यांची झडप कधीही येऊ शकते, गडाच्याखाली मन प्रसन्न करणारा एक छोटा धबधबा आहे. पावसाळ्यात तर इथले वातावरण खूपच सुंदर असते.
हा किल्ला दोन थरांत विभागला आहे. एक, गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच होय. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ अर्धा एकर असावे. दुसरा विभाग म्हणजे, गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते. पठारावरून गडमाथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत.
गडावर जाण्यासाठी
वाघोबा खिंड मार्गे जावावे. वाघोबा खिंडीला जाण्यासाठी लोक मुंबईहुन विरारमार्गे पालघरला किंवा कल्याणहून एस. टी. ने पालघरला येतात व मनोरेला जाणाऱ्या बसने 'वाघोबा' नावाच्या देवळाच्या थांब्यावर उतरतात. येथूनच, देवळाच्या उजवीकडे जाणाऱ्या वाटेने गेल्यास माणूस गडावर पोहचू शकतो.
लॉकडाऊन नंतर शितीलथा झाल्यावर २०२१ च्या पहिल्या पावसाळी ऋतू दरम्यान कल्पेश व त्याच्या सहकाऱ्यांबरोबर खूप चांगल्याप्रकारे हा प्रवास व गिर्यारोहण झाला.
पुन्हा भेटू!!!