ट्रेक म्हणजे ट्रेकर्स च्या आयुष्यात एक वेगळाच अविभाज्य भाग असतो, तो त्याला नवी विचारधारा घेऊन जगायला प्रेरित करतो आणि प्रत्येक ट्रेकर्स च्या व्याख्या ह्या त्याच्याप्रमाणे भावनीक असतात, त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून ट्रेकर्सची ची व्याख्या शब्दात मांडणे कठीण होईल आणि प्रयत्न जरी केला तरी शब्द अपुरे पडतील...
३० जून ला माझं मुळात नाशिक येथे 'हरिहर' ला जाण्याचे ठरलेले, पण काही कारणात्सव तेथे रद्द करावे लागले आणि रोशन सोनगिरी ट्रेक संदर्भात, गेल्या एक आठवड्यापासून माझ्या संपर्कात होता. अगदी सर्वकाही तयारी असूनही शेवटच्या क्षणी हरिहर साठी रद्द झाले, म्हणूनच मी या सोनगिरी ला येऊ शकलो, ह्यात काही शंका नाही.
ठरल्याप्रमाणे सर्व योग्य वेळेवर कर्जत ला पोहोचले. रोशन बरोबर माझे पहिलेच ट्रेक होते, त्यामुळे तो समोर असलेल्या व्यक्तींशी ओळख करून देत होता. असे होत होताच थोड्याच वेळात जयेशने ने सर्वांना चहासाठी विचारले आणि चहा म्हणजे माझ्यासाठी ट्रेक च्या अगोदरचं पहिले समाधान. थोड्याच वेळात सर्वांचे चहापान झाल्यावर आम्ही सर्व सोनगिरी गडाच्या पायथ्याशी रवाना झालो. गाडीतून उतरताच काही मिनिटांनी वरूण राजाने हजेरी लावली आणि सर्वांचे स्वागत केले. मनामध्ये लगेच एक आठवण ताजी झाली. १६ जून च्या रविवारी मी 'कळसुबाई ट्रेक' करून पायथ्याशी परतल्यावर पाऊस आलेला. तेव्हा यशस्वी ट्रेक पूर्ण झाल्यावर बक्षीस म्हणून आणि आत्ता ट्रेकिंग ला सुरुवात म्हणून पावसाचं आमच्यासाठीचं स्वागत म्हणून येणं, हे मनाला एक वेगळाच आनंद देत होते. व्यक्ती मोजणी साठी वर्तुळाकार रिंगण करून मयूर दादाने माहिती दिल्यावर आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. पावसामध्ये गड चढण्याचा आनंदच वेगळा होता. मयूर दादा आणि जयेश आयोजक असल्यामुळे वाटा अगदी सहज सापडत होत्या. काहीच वेळात मोकळी निसर्गरम्य जागा मिळाल्यामुळे तेथे फोटोसेशन चालू केलेले व एक आवड म्हणून मामांनी एका वाहत्या पाण्यात छोटासा धरण बांधलेला. थोड्याच वेळात असे समजण्यात आले कि अजून पुढे वर गेल्यावर प्रशस्त अशी मोकळी जागा आहे, त्यामुळे आम्ही तेथून निघालो. ठरल्याप्रमाणे पुढे आल्यावर फोटोसेशन परत चालू केले, पण जयेश, मयूर व ३-४ इतर सहकारी बांधव ब्रेकफास्ट म्हणून चायनीज भेळ बनवण्यासाठी गेले. ब्रेकफास्ट आणि फोटोसेशन आटपल्यावर पुढील ट्रेकसाठी पुन्हा सर्वजण सज्ज झाले. मित्रभाऊ रोशन सोबतच होता, शिवाय अन्य मित्र ही सोबत होते. रोशन मला अगदी सुरवातीपासून त्याला माहित असल्याप्रमाणे झाडांची माहिती देत होता. शेखर... हे बघ ह्याची अशी भाजी करतात. त्याची तशी भाजी करतात वैगरे...वैगरे... पायवाटांच्या बाजूलाच मश्रुमही दिसत होते. 'करटावले' म्हणून एक फळ येते ते मला रोशन च्या सांगण्यावरून माहित झाले.. ते शोधण्यात रोशन ट्रेक चालू असताना मध्येच व्यस्त झालेला आणि वरून सांगत पण होता कि हे तुला सहज दिसणार नाहीत, वेलींच्या खाली दिसतील. अशी मज्जा आणि निसर्गाचा आस्वाद असताना फार मोठा आनंद वाटत होता. गडाच्या माथ्याशी पोहोचतेवेळी मध्येच २ पॅच खडतर होते. पण ते आयोजक, तसेच चंदू आणि जीत व इतर सहकारी यांच्या मदतीमुळे सर्वांना सहज शक्य झाले. वाटेतच मुंग्याचे वारुळही दिसत होते, मयूर दादाने सांगितले मुंग्यांच्या वारूळाचा आकार ज्या ठिकाणी निमुळता असेल ती म्हणजे पूर्व दिशा. हे मला त्याच्या सांगण्यावरून कळले. सर्वात शेवटचा म्हणजेच तिसरा पॅच हा खडतरच होता, पण कातळ असल्यामुळे फारसे जाणवले नाही. फायनली गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर मंद वारा, रिमझीम येणारा पाऊस व धुके हे म्हणजे फार एक जबरदस्त आल्हाददायक होते. तिथेही फोटोसेशन व नंतर स्वप्नील ने शिववंदना दिली व आम्ही परतीच्या प्रवासास सुरुवात करताच बाहेरील अन्य दोनशे ट्रेकर्सचा समूह सुद्धा तेथे आलेला, तिथे एकच पायवाट असल्यामुळे अव्यवस्था निर्माण झालेली, तरी सुद्धा आम्ही आळीपाळीने मार्गस्थ होत होतो. उतरताना मातीच्या २ खडतर पॅचची रिस्क होतीच. पण जयेश, चंदू, मयूर, जीत, स्वप्नील व रोशन यांच्यामुळे तसेच इतर सहकार्यांमुळे वाट उतरणे अगदी सहज सोप्पे झाले. आठवणींचे जतन व्हावे म्हणून चंदुदादाने स्नॅप्स शुट करणे चालूच ठेवलेले. पुढे ज्याठिकाणी आम्ही ब्रेकफास्ट ला थांबलेलो त्याच ठिकाणी दुपारच्या जेवणाची सोय होती. अगदी पुरेपूर आणि मस्त जेवण झाले. निसर्गाच्या सानिध्यात होणारे जेवण म्हणजे मनाला सुख:द धक्का देणारा आनंद होता. हे सर्व झाल्यावर पुन्हा उतरण्यास सुरुवात केली. उतरण्याच्या वेळेस फटाफट येत होतो, पण त्यात एका ठिकाणी रस्ता चुकला आणि वेळीच डिंपल वहिनींच्या लक्षात आले. परत थोड्याच वेळात लक्षात आले कि दुसऱ्या वाटेने निघायचे आहे, जो रेल्वे ट्रेकवर नेत होता. रेल्वे ट्रेक वर पोहोचताच थोडासा आराम केला कारण सर्वजण जमा होणे बाकी होते.
सर्वजण जमल्यावर गाड्या जिथे येणार होत्या तिथे परत मार्गस्थ होण्याची सुरुवात केली. वाटेतच एक छोटा अजगर अर्धमृत अवस्थेत सापडलेला, बहुतेक अगोदर त्याला कोणी मारण्याचा प्रयत्न केला असावा, पण काही कथा वाचून आहे, त्यामुळे त्याच्या जवळ जास्त जाण्याचा मी काही प्रयत्न केला नाही. पुढे गाड्या आल्यावर आम्ही सर्वजण तेथून निघताच मामा व एक मित्र तेथून निघून जाणार असे कळल्यावर त्यांना निरोप देऊन आम्ही सर्वांनी परतीच्या प्रवासास सुरुवात केली. निघाल्यावर रोशन गाडीमध्ये बाजूलाच होता त्यामुळे रात्री च्या जेवणासाठी आग्रह करत होता. घाटकोपर ला फ्रेश हो जेवून घे आणि मग आरामात मालाड ला निघ. असे बोलत होता. पण त्याला बोललो आत्ता नको नंतर निवांत येयीन तुझ्याकडे..
अशाप्रकारे सोनगिरी ट्रेक हा खूप मस्त एक्सप्लोर केला. त्यात नवीन मित्रमंडळींशी ओळख झाली. सर्वांनी फार चांगल्या प्रकारे सुयोजन केले. सर्वांचीच नावे घेत राहिलो तर पुन्हा परत एकदा लिस्ट बनेल. व सर्वांचे आभार मानले तर योग्य राहणार नाही, कारण आभार मानून नुकतेच नवनवीन झालेल्या मित्रमंडळींना परके केल्यासारखे वाटेल. म्हणून आभार न मानता तुर्तास थांबतो, व पुढच्या ट्रेकला नक्कीच भेटू!
--/ चंद्रशेखर सावंत
खूप सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद...
उत्तर द्याहटवा