गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

कलावंतीण दुर्ग




उंची : २३०० फूट 
ठिकाण : पनवेल 
जिल्हा : रायगड. 





मागच्या रविवारी कलावंतीण ट्रेक ला जायायचे आहे हे अचानक पणे ठरले. ट्रेक च्या अगोदर २ दिवसापूर्वी नाशिक येथे असणाऱ्या हरिहर ला जाण्याचा बेत ठरलेला आणि नेमके ट्रेकिंगच्याच दिवशी सकाळी निघताना कलावंतीण ट्रेक करायचे आहे असे ठरले. आत्ता ठरलेच आहे तर मागे हटायचे नाही किंवा निराश नाही व्हायायचे, याची समजूत घेऊन ठीक सकाळी ०४.०० वाजता ट्रेक साठी ठरलेले मित्र एकमेकांना संपर्क करून निघालो व ०५.०० वाजता मालाड येथून निघालो. अगदी ठीक ०६.३० ला म्हणजे अवघ्या ०१.३० तासात आम्ही पनवेल येथे पोहोचलो. तिकडे थोडासा रिलॅक्स व नाष्टा करून घेतला. कळंबोळी पासून पनवेल बायपास ने आल्यास मुंबई-पुणे हा महामार्ग जोडला जातो व त्याला लागूनच शेडुंग फाटा आहे. तेथून आत गेल्यास ४० मिनिटाच्या अंतरावर ठाकूरवाडी गाव लागते, तिथूनच डावीकडे वळण घेतल्यास कलावंतीण आणि प्रबळगडाकडे जाण्याचे मार्ग आहेत. ट्रेकिंग चालू केल्यानंतरच काही अंतरावर आम्हाला ५० रुपये प्रवेश फी आकारण्यात आली. 


कलावंतीण परिसरात आढळणारे विषारी सर्प 

प्रवेश फी दिल्यावरच परिसरात आढळणारे विषारी सर्प यांचा पोस्टर तिथे दिसला. आम्ही वाट बघतच होतो असा कोणता सरपटणारा प्राणी आम्हाला दिसतोय का पण सरडा मात्र तेवढा दिसला. पुढे आल्यानंतर २-३ शॉर्टकट्स दिसले त्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी करणार हे आम्हाला निश्चित माहित होते.

वाटेत मला दिसलेला सरडा 





कलावंतीण ट्रेक साठी तयार झालेले माझ्या सोबतचे ट्रेकर्स. डावीकडून अक्षय नाईक, गौरव, मी, दिव्येश आणि अक्षय धनावडे 

            पायथ्याशी पोहोचल्यावर उजव्या बाजूला मस्त टुमदार शहरी घरे, कॉटेजेस आणि डाव्या बाजूला मस्त निसर्गाने हिरवी शाल पांघरलेली. येथूनच मनाला एक वेगळा स्पर्श होण्यास सुरुवात झालेली. मस्त थंडगार वातावरणात मनमोहक निसर्गरम्य वातावरणाचे छायाचित्र टिपत व गप्पागोष्टी करत आम्हाला ०१.३० तासाभरांनी एक गाव लागले. परत तिकडे थोडासा आराम करून घेतला कारण मुख्य चढाई तर अजून बरीच बाकी होती.पाऊण तास वेळ घालवून परत नाष्ट्यासाठी मॅगी वैगरे खाऊन आम्ही परत गिर्यारोहणास सुरुवात केली.




मला फुलांना स्पर्श करण्याचा मोह आवरला नाही. 


निसर्गाचा आस्वाद घेणारा दिव्येश





निसर्गरम्य वातावरणात सकाळचा नाष्टा 




 निवांत 




           ०९.१५ च्या आसपास आम्ही काही अंतर पार केलेले. वाटेत उसाचा रस, लिंबू पाणी, कोकम सरबत, काकडी वैगरे या सारखे खाणे व पिणे चालूच होते. निम्मे अंतर पार केल्यानंतर खाली नजर टाकल्यावर विलोभनीय असे दृश्य मनाला उमंग देण्यास प्रेरित करत होते. असे सर्व होत असता ११.०० च्या आसपास आम्ही कलावंतीण च्या पायथ्याशी येउन पोहोचलो. १० मिनिटे वेळ आम्ही अगदी आवर्जून घेतला कारण पुढे निमुळता रस्ता आणि प्रचंड धोकादायक व बाजूला खोल दरी असल्यामुळे अवघड ठिकाणी थांबणे हे तर जमणारच नव्हते. 



          माहितीप्रमाणे प्रबळगड हा मुघलांच्या ताब्यात होता व प्रबळगडाचा किल्लेदार हा राजपूत घराण्याचा होता. त्याचे कुणी एका कलावंती वर प्रेम होते. ती तेथून निघून जाऊ नये म्हणून त्याने तिला प्रबळगडाच्या सुळक्यावर म्हणजेच कलावंतीण वर नेऊन ठेवले. तेव्हा पासून तो सुळका कलावंतीण म्हणून ओळखला जाऊ लागला. ह्या कलावंतीण आणि ठाकूरवाडीतील गावकऱ्यांचे नाते असल्यामुळे दर शिमग्याला हे गावकरी अगदी ना चुकता जातात व ठाकूर नृत्य करतात.
बाजूलाच दिव्येश होता. त्याला बोललो चल आत्ता ट्रेक करायला काय हरकत नाही. तत्पूर्वी सोबत असलेल्या बॅग्स आम्ही मुख्य पायथ्याशी असणाऱ्या एक छोट्याश्या गृहात ठेवले. चढाईसाठी सुरुवात चालू केल्यानंतर जेवढं पुढे जावे तेवढं रस्ता निमुळता होत होता. खरंच मित्रांनो... ट्रेकिंग म्हणजे आयुष्याला मिळालेलं वरदान होय. कठीण प्रसंगावर मात करून अगदी जिद्दीने पुढे जाता येते हे मात्र अगदी निसंकोचपणे. 



पायथ्याच्या येथून सुरुवात करताच दिसणारा दृश्य 



कलावंतीण दुर्ग च्या मुख्य पायथ्याच्या येथून टिपलेला छायाचित्र

          काही वेळातच म्हणजे ११.३५ ला आम्ही कलावंतीण सुळक्याच्या शेंड्यावर आलो आणि आनंदाला अंकुर फुटत राहिले, तरीसुद्धा पूर्णतः टॉप वर जाणे अजून बाकीचं होते. विचार केला एवढं चढलोय तर थोडेसेच बाकी आहे पण मनात मात्र भीती होतीच. बाजूला खोल दरी आणि वर १५-२० फूट टॉप वर जायायला फक्त दोरखंड आणि हा रॉक पॅच आम्ही पूर्ण केला व अंगावर आनंदाचे शहारे येत होते व आनंद बहुगुणी झाला. आमची इथवर पर्यंत केलेली वाटचाल व सोबतच प्रबळगडाचा माथा, पूर्वेकडे माथेरान पर्वतरांग, पश्चिमेकडे मुंबईशहर, उत्तरेकडे चंदेरी, उत्तरपश्चिमेकडे पेब चा किल्ला अर्थातच विकत गड, दक्षिणेकडे इरशाळ गड असा हा प्रवास स्वर्गाचाच आनंद देत होता. अर्धा-पाऊण तास फोटो वैगरे काढून झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासास सुरुवात केली. उतरताना सुद्धा तीच अवस्था विरुद्ध दिशेला म्हणजे शेंडा असणाऱ्या बाजूस चेहरा करून उतरावे लागत होते म्हणजे जरा जास्त सोयीस्कर. अगोदर बाकीच्या गडांचा अनुभव असला तरीही कोरलेल्या पायऱ्या उतरेपर्यंत जीव मुठीत होता.



   On The Top in कलावंतीण 
    गौरव, अक्षय आणि मी 



वाटेतून दिसणारे मनमोहक दृश्ये 




           पूर्णतः पायऱ्या उतरल्यानंतर जंगल सफारी सुरु झाली काही अंतरावर आम्हाला एक गुंफा दिसली, या गुहेत जाताना सरपटून किंवा बसून जाण्यास पर्याय नाही. गुहेत शिरताना टॉर्च अनिवार्य आहे व सोबत माहिती दर्शक असावा तरच आतमध्ये जाणे योग्य. आम्ही मोबाईल फ्लॅशेस चा वापर करून गुहेत शिरण्याचे धाडस केले. गुहेत शिरल्यानंतर १०-११ फूट सरळ, नंतर डावीकडे ३-४ फूट असे पुढे आल्यावर एक खोली दिसते. आत आल्यावर प्रचंड गरम व्हायायला लागले कारण हवा वैगरे काहीच नव्हती. पूर्वीच्या काळी कदाचित गुप्त बैठक साठी ती असावी. गुहेत जाण्या-येण्यासाठी एकच मार्गाचा वापर करता येतो. गुहेच्या बाहेर आल्यानंतर मोकळी हवा मिळाली आणि प्रसन्न वाटू लागले. परतीच्या मार्गावर असताना एका उसाच्या रस विक्रेत्याकडे मला सुगरणीचे घरटे दिसले. मला सुगरणीचे आश्चर्य वाटते. मी हरखूनच गेलो. घरटं हातात घेतलं तर काय आश्चर्यच! त्याच्या कडे १०-११ घरटे होते मला आवडलेल्या पैकी मी तो एक विकत घेतला. मी एकदा कवयित्री बहिणाबाईंची सुगरणीवर आधारित कविता वाचलेली. !!अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला !! असा माझा कलावंतीण प्रवास आयुष्याला उमंग देणारा ट्रेक आत्ता शेवट पर्यंत लक्षात राहील. 

मी आणि सोबत सुगरणीचे घरटे 


उतरताना वाटेत दिसलेली गुंफा 



यशस्वी २३०० फूट उंच कलावंतीण ट्रेक 


                                                             --/ चंद्रशेखर सावंत 
                                                                              मालाड, मुंबई : ४०० ०९७


५ टिप्पण्या: