शनिवार, २३ मार्च, २०१९

स्वराज्य निर्माता


                 छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रामधीलच नाही तर संपूर्ण भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक दैवी चमत्कारच होता. त्यांची आई जिजाबाई हि रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावातील. लखुजी जाधवराव या निजामशाहीतील शूर सरदाराची मुलगी तर वडील शहाजीराजे भोसले हे स्वकर्तुत्वाने सामर्थवान बनलेल्या मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव राजकारणात मुरलेल्या व स्वातंत्र्याची जिद्द बाळगणाऱ्या माता -पित्याच्या पोटी शिवाजीचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या वर्षी वैशाख शुद्ध द्वितीयेस जुन्नर जवळ शिवनेरी या किल्ल्यावर झाला. (तिथीप्रमाणे शिवजयंतीची तारीख बदलत असते.) शिवबाच्या जन्माने साडेतीनशे वर्षांच्या काळ्याकुट्ट अशा मोगल, आदिलशहा, सिद्दी यांच्या जुलूमी राजवटीचा अस्त झाला. जिजाऊ ही शिवबाजी केवळ जन्मदात्री नव्हती तर त्यांची ती स्फूर्ती, प्रेरणा, मार्गदर्शिका व मायेची सावली होती. जिजाऊंचे पुत्रप्रेम अजोड होते, तर शिवरायांची मातृभक्ती अपरंपार होती. पराक्रमी व कर्तृत्वान अशा आदर्श मातेचे छत्र शिवरायांना लाभलं. शिवबाच्या मातृभक्तीचं प्रत्यय यावं यासाठी एका प्रसंगाची आठवण करुन देणं आवश्यक वाटते. एके दिवशी शहाजीराजे शिवबासह विजापूरच्या आदिलशहांना भेटण्यासाठी गेले होते. शहाजींनी बादशाहाला मुजरा केला. शिवबा मात्र ताठ मानेनं बादशहांना न्याहाळीत होता. शहाजी शिवबांजवळ गेले आणि बादशाहाला मुजरा करण्यास सांगितले. परंतु शिवबा नि:स्तब्ध होते. जिजाउंची शिवबाला शिकवण होती की, प्रणाम करायचा तो फक्त माता-पिता व परमेश्वराला. हीच शिकवण आत्मसात करुन शिवबांनी सुलतानाला मुजरा करण्यास नकार दिला. खरं तर शहाजीराजेंची अवज्ञा करण्याचा शिवबाचा हेतू नव्हता. योग्य नसलेल्या माणसाला मुजरा नाकारला, यात शिवबाचं काय चुकलं, असा प्रतिसवाल जिजाऊंनी शहाजीराजेंना या घटनेवर चर्चेदरम्यान केला. आईसारखे परमदैवत दुसरं नाही, हे शिवबाच्या मातृभक्तीने सिद्ध केलं.
                  स्वदेश स्वतंत्र व्हावा हि माता-पित्याची ईच्छा शिवाजी महाराजांनी पूर्ण केली. हिंदू धर्माचा नाईनाट करून सर्व हिंदुस्थान मुघल साम्राज्य करून टाकावा या आकांशेने झपाटलेला औरंगजेब बादशाह हा दिल्लीच्या तख्तावर होता.विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही. तो दिल्लीवरून सतत त्यांना पैसा व सैन्य पाठवत होता. माता जिजाऊ आणि शिवाजी राजे यांच्या मनात या अन्यायकारी वृत्तींचा विरोध आणि चीड निर्माण करून स्वातंत्र्य आणि स्वराज्य या विषयीच्या निष्ठा निर्माण केल्या. शिवाजी राज्यांच्या गुणांचा विकास केला आणि हळूहळू शिवाजी राजे प्रयत्न करू लागले. मराठी माणसाच्या मनातील रागाला नेमकी दिशा दाखविण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा’  हे सूत्रे धरून स्वातंत्र्य प्रेमी, व पराक्रमी, माणसांना एकत्रित केले. औरंगजेब हा जबरजस्त लष्करी सामर्थ्याचा पराक्रमी, कट्टर मुस्लीम व दक्षिणेतील राजकारणी माहिती असलेला बादशहा होता. पण शिवाजीने अफझलखाना सारख्या पराक्रमी मुसलमान सरदाराला जिवंत असे पर्यंत महाराष्ट्रात येण्याची त्याची हिम्मत झाली नाही. औरंगजेबाने शिवाजीरायांना पकडून आग्रा येथे ठेवले. पण तेथुही ते चातुर्याने निसटले. तेव्हा औरंगजेबाने धसकाच घेतला.
शिवबाला युद्धतंत्रांचे शिक्षण देण्यासाठी जिजाऊंनी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. तलवार चालविणे, तिरंदाजी करणं, लढाईचे आराखडे तयार करणे, मैदानावरील तसेच डोंगरी मुलूखावरील लढाई कशी करायची याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं. जिजाऊंनी शिवबाला रामायण-महाभारताच्या कथांच्या माध्यमातून रामाचा पराक्रम, भीमार्जुनाचे युद्धकौशल्य, युधिष्ठीरची धर्मनिष्ठा, पृथ्वीवरील दुष्टांचा संहार करण्यासाठी श्रीकृष्णाने वापरलेली कुटील-नितीची शिकवण दिली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे छत्रपतींना हिंदवी स्वराज्याचा राजा बनवायचा. शिवबाला छत्रपती बनविण्यासाठी जिजाऊंनी प्राणपणालालावले.
             शिवाजी महाराजांना लढाईचे राज्य कारभाराचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांनी दिले. दहा-बारा वर्षाचा असतानाच शिवाजींच्या मनात स्वातंत्र्याचे वारे खेळू लागले. माझा देश मोगलांच्या आणि मुसलमानांच्या गुलामीतून मुक्त करायचा. माझ्या बांधवांना गुलामीतून व छळातून मुक्त करायचेच! हाच उद्देश ठेवून त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकून सवंगडी जमा केले. तानाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी, येसाजी आणि एकांपेक्षा ऐक जिवाला जीव देणारे मित्र गोळा केले.  एका स्वरांत घोषणा दिली. ” हर हर महादेव” महाराष्ट्रातल्या मावळखोर्यांपासून त्यांनी आपल्या प्रयत्नांना आरंभ केला. साम-दाम-दंड-भेद यांचा उपयोग करत वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी ‘तोरणागड’ जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि मग त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. एका मागून एक गड आणि किल्ले जिंकून घेतले. युद्धात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा वापर जास्त केला. राक्षसी प्रवृत्तीचा अफझलखान भेटीचे ढोंग करून शिवाजीचा घात करायला आला होता. प्रतापगडावर भेट ठरल्याप्रमाणे मिठी मारण्याचे सोंग करून त्याने शिवाजीवर तलवार चालवली. पण शिवाजी महाराज सावध होतेच. हातात ठेवलेल्या वाघनखांनी अफझलखानचा कोथडाच काढला. पळून गेला म्हणून शाहिस्तेखान वाचला. शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करतांना येणाऱ्या प्रत्तेक संकटांला धीराने सामोरे गेले. पण त्यांचे सवंगडीही त्यांना समर्थ साथ देत होते.  सिंहगड घेतांना तानाजी पडला. खिंड लढवितांना  बाजीप्रभुणे छातीचा कोट केला . मुरारबाजी महाडकर, प्रतापराव गुजर अशा एकाहून एक शूर सवंगड्यानी आपले प्राण दिले . स्वराज्यात आता चोऱ्याऐंशी किल्ले आणि दोनशे चाळीस गड होते.
लोकांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याचा आग्रह केला. महाराजांनी आपल्या जिजाबाई यांच्याशी आणि जवळच्या सरदारांशी चर्चा करून राज्यभिषेक करवून घ्यायचा असे ठरवले. स्वराज्याची राजधानी रायगड ठरली. हिंदवी स्वराज्याचा राजा सिंहासनावर बसला. लोकांनी जयजयकार केला. जिजाऊंनी पाहिलेलं स्वप्न 1674 साली अखेर प्रत्यक्षात उतरलं. ६ जून १६७४ रोजी जिजाऊचा शिवबा छत्रपती झाला. काशीच्या गागाभट्टांकडे या सोहळ्याचे पौराहित्य सोपविण्यात आलं होतं. ६ जून १६७४ रोजी पहाटे पाचच्या सुमारास शिवबाचा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. छत्रपतींना तोफांची सलामी देण्यात आली. सिंहासनावर आरुढ होण्यापूर्वी महाराजांनी मातोश्रींच्या चरणी वंदन करुन त्यांचा आशीर्वाद घेतला. जिजाऊंच्या डोळांचं पारणं फिटलं. आपल्या हातानं शिवरायांची दृष्ट काढत जिजाऊ म्हणाल्या, शिबवा, तू महाराष्ट्राचा राजा झालास, रयतेचा राजा झालास. शिवबांचा राज्याभिषेक 'ह्याच देही ह्याच डोळा' पहावा यासाठी जिजाऊंनी आपला जीव जणू मुठीत आवळून ठेवला होता. कारण राज्याभिषेक झाल्यावर अवघ्या दहा दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.
                शिवाजी महाराजांनी आपले जीवन देश, देश आणि धर्म यासाठी वेचले.  संत तुकाराम हे त्याचे अध्यात्मिक गुरु होते. तर संत रामदास हे त्याचे राजकीय गुरु होते. शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक ६ जून, १६७४ साली रायगडावर साला. त्यानंतर थोड्याच काळात म्हणजे ६ वर्षानंतर ३ एप्रिल, १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले. रामदासांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले.

“निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ।।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।

                                                          शिवरायांचे कुलदैवत तुळजाभवानी

                महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन पीठे असून उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणार्‍या देवीचे हे स्थान जागृत असून नवसाला पावणारे आहे. संकटाला धावून येणार्‍या तुळजाभवानीचे इतिहासातही दाखले सापडतात. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजा तुळजाभावनीचे निस्सीम उपासक होते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराज दरवेळी देवीचे दर्शन घेत असत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात आईने महाराजांना तुळजाभवानी तलवार प्रदान केल्याचे सांगितले जाते. श्रीक्षेत्र तुळजापूर हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात डोंगर पठारावर वसलेले गाव आहे. समुद्रसपाटीपासून २७० फुट उंचावर असलेले हे तालुक्याचे ठिकाण उस्मानाबादपासून १८ किलोमीटर तर सोलापूरपासून ४४ किलोमीटरवर आहे. पूर्वी हा भाग डोंगराळ पण घनदाट अरण्याने व्यापलेला होता. या भागात चिंचेची खूप झाडे असल्याने त्यास चिंचपूर असेही म्हटले जायचे.

--/ चंद्रशेखर सावंत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा