बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात आणि सायकलींग...

 



    आयुष्यात काही क्षण असे जगावे लागतात की एखाद्या वेळी आपल्याला एखाद्या गोष्टीची खूप आठवण येत असते आणि काही कारणात्सव त्या गोष्टी राहून जातात. अशीच एक बाब म्हणजे निसर्गाचा सहवास.. पूर्वीचं आयुष्य माणसाचं किती सुंदर होतं ना. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांव्यतिरिक्त तो जास्त काय विचारच नाही करायचा अन्नासाठी पण तो निसर्गातून मिळणाऱ्या कंदमुळे तसेच फळे खाऊन जगायचा व खूप सुंदर त्याचे आयुष्य निघून जायचे अर्थातच आयुष्य म्हणजे नक्की काय हे आपल्याला त्या काळात गेल्यावर खऱ्या अर्थाने कळेल. असेच काही विचार चालू असताना मी तळमजल्यावर जरा पाय मोकळे करायला गेलेलो, आणि तितक्यात मला अनिकेतची आठवण आली आणि त्याला संपर्क केला. अनिकेत म्हणजे माझ्यासाठी भावासारखा, एक चालता बोलता फिरणारा निसर्ग मित्र, एक मोटिवेशन देणारा, सतत निसर्गावर बोलणारा, मेडीटेशन इत्यादी बाबींवर सतत बोलत राहणारा माझा एक मित्र. एक वेळ होती कोव्हिड-१९ यायच्या अगोदर आम्ही रोज सकाळी ०६.३० वाजता बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भेटायचो. भेट झाली की त्याच्या सोबत जॉगिंग, मेडीटेशन, सूर्यनमस्कार ह्या सर्व गोष्टी झाल्या की गांधीटेकडी वरून सूर्योदयच्या वेळेला सूर्यदेवाला नमस्कार करून आम्ही परतीच्या दिशेला निघायचो आणि खरोखरचं त्या वेळेला दिवस अगदी छान जायचा कारण निसर्गाच्या सहवासात माणसाला खरी ऊर्जा मिळते हे मला तेव्हा समजलं. मी कधी कोणत्या रविवारी गिर्यारोहणासाठी मुंबईच्या बाहेर नाही गेलो तर बोरिवलीला सायकलींग माझी ठरलेलीच असायची असं सर्व हे असायचं.. तर अनिकेतला बोललो मी अनिकेत उद्या रविवार आहे तर चल नॅशनल पार्क मध्ये जाऊन येऊ. आम्ही रविवारी ठीक सकाळी ७:४५ ला नॅशनल पार्कच्या गेटवर भेटलो आणि सर्व जुन्या निसर्गाच्या आठवणी जागृत झाल्या. थोड्या वेळात म्हणजेच ८ वाजता गेट उघडलं जाणार होतं. ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस येण्याची शक्यता होती. मी तर सायकल बाहेरून भाड्याने घेतली होती. नॅशनल पार्क गेट च्या समोर ओंकारेश्वर मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पाठीमागेच हॅरी बायसायकल रेंटल म्हणून एक दुकान आहे. येथे ह्या सायकली आपल्याला भाडे तत्वावर मुंबईमध्ये कुठेही जाण्यासाठी मिळू शकतील. प्रत्येक सायकलीची वेगवेगळी किंमत आहे. ८ वाजता आत मध्ये शिरताच आम्ही लगेच तिकीट काढून निसर्ग प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा सर्व काही गोष्टी आमच्या डोळ्यासमोरून जात होत्या. शारीरिक मजबूती साठी एक वेळेला तर तिकडे Skechers GoRun Club चे कॅम्प असायचे आणि तेव्हा अनिकेत आणि मी तिथे सुद्धा जायचो. पुढे जाता जाता आम्हाला एक पूल लागला आणि तिथे थोडा वेळ उभा राहून नैसर्गिक झऱ्यांचा आवाज ऐकत उभे राहिलो व त्याच्याच पुढे पिकनिक पॉइंट म्हणून एक स्टॉप आहे तिथून उजव्या बाजूला वळल्यावर थोड्याकाही अंतरावर परत पूल लागला आणि आम्ही तिथे थांबून नदीत थोडावेळ पाय भिजवण्यासाठी खाली उतरलो तर आहाहा... हिमाचल सारख्या थंडाव्याचा भास जाणवू लागला. तिथे थोडावेळ फोटोग्राफी केल्यावर आम्ही परत पुढे निघालो पण कान्हेरी लेणी पर्यंत काय आम्हाला जाता आले नाही कारण तिथे जाणे पुढे बंद केलेले. त्यामुळे तिथूनच आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. सायकल चालवताना आणि हृदयात जाणारा निसर्गातील मिळणारा थंड हवेचा ऑक्सिजन आहाहा... अफाट असतात हे क्षण. पुढे परतीच्या प्रवासादरम्यान पिकनिक पॉइंटला मावश्या आणि बहिणी वनमेवा घेऊन बसलेल्या. तेव्हा निसर्गाचा आस्वाद घेत विविध प्रकारची फळे आम्ही खाल्ली. नंतर आम्ही तिथून मिसळपाव, भजी आणि वडापाव खाण्यासाठी तंबू हॉटेलमध्ये आलो तिथे ह्या सर्वाचा आस्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासास निघालो पण पूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवावा असे मनोमन वाटत होते. 



१०४चौ.की.मी. परिसरात पसरलेले हे जंगल गेल्या ३० - ४० वर्षांपासून हौशी पर्यटकांचे मन तृप्त करत आहे. या जंगलात वन्य प्राण्यांचा संचार असल्याने काही भागात पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. येथे वाघ, सिंह, चित्ता, सांबर, माकड, सर्प यांसारखे वन्य प्राणी अजूनही आढळतात. सरकार तर्फ़े येथे व्याघ्र प्रकल्प राबवला जात आहे, तर या वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी जंगलसफारीची देखील सोय उपलब्ध केलेली आहे.

अश्या प्रकारे सायकलींग आणि निसर्गाची लाभलेली साथ आणि बरोबर असलेला मित्र अनिकेत हे सर्व अफाट होतं एकदम.. 

भेटू पुन्हा 


धन्यवाद..














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा