आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे गड किल्ल्यांचे वैभव महाराष्ट्राला प्राप्त झाले आहे..
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
आपल्या सर्वांनाच आपल्या महाराष्ट्र विषयी प्रचंड अभिमान असला पाहिजे याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज ह्या आपल्या भूमीत जन्माला आले व त्यांचा इतिहास डोळ्यांसमोरून जाताना सतत त्यांच्याविषयी आदर निर्माण होऊन वास्तव जीवनात त्यांचा आदर्श आपल्या समोर येतो व आपण रोज दैनंदिन व्यवहारात आणला तर आयुष्यातले क्षण समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही हा माझा पूर्ण विश्वास आहे.
माझ्या आयुष्यात स्वजबाबदारी वर फक्त स्वतःच केलेला सर्वात पाहिलं गिर्यारोहण म्हणजे पनवेल ला असणारे किल्ले कर्नाळा व दुसरा म्हणजे रायगड तालुक्यातील रोहा तालुक्यातील असलेले अवचितगड. मी फक्त ह्या गडविषयी ऐकून होतो पण हा मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या नजीकच्या रोहा येथेच आहे हे मला माहीत नव्हते हळू हळू ह्याविषयी माहीत करण्याची उत्सुकता वाढू लागली व शेवटी अवचितगड साठी गिर्यारोहण करण्याचा दिवस उजाडला..२ ऑक्टोबर, २०१९ रोजी ठीक सकाळी ०४.३० वाजता मालाड हून बोरिवली नॅन्सी कॉलनी येथे निघालो तिथून मला एक खाजगी वाहन मिळालं.. मुंबई पुणे महामार्ग पकडून पाहिलं कोलाड गाठले व पुढे रोहा रोजच्या येथून ह्या गावी रवाना होत असतानाच एस. टी मध्ये एक आजोबा मिळाले. मस्त आनंदी त्यांचा चेहरा
गावाकडचा माणूस म्हणजे मन जिंकणारा.. सारखे माझ्याकडे पाहत होते याचे कारण मला अद्यापही समजलेले नाही.. त्यांना कळताच, मी मेढा मध्ये पहिल्यांदाच जात असल्याने मला त्यांनी तिकिटाचा दर ही सांगितला व आमच्या गप्पा चालू झाल्या..
आजोबा:- काय मग कुठे चाललास?
मी:- अवचित गडावर
आजोबा:- बापरे.. एकटाच चाललास? आत्ता कुठे उन्हातून चाललास? तुझं जेवण झालं आहे का?
बॅगेत काही खाण्यासाठी ठेवलं आहेस का? गाव कुठचं तुमचं?
या सारख्या येत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन मेढा बस थांब्यावर त्यांच्या सोबत एक सेल्फी काढून घेतला.
तर हा तेव्हाचा क्षण.
आजोबा काही काळासाठी मित्र झालेले हे कळलेच नव्हते...
सांगायचं तात्पर्य एवढंच की आत्ता अशी माणसे फार क्वचित राहिली हो..
पुढे मेढा या गावातून रवाना होत असताना इतिहासातल्या क्षणांचा सहवास मनाला फार आकर्षित करून घेत होता.. व गडाच्या दिशेला मार्गस्थ होत असतानाच आपण स्वतः एक विशेष असल्याचा अनुभव जाणवतो तो म्हणजे एक विशेष अनुभव असतो..
दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजुबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुखद अनुभव ठरतो. रोह्यापासून ५ किमी वर असलेल्या पिंगळसई गावापासून गडाची उंची ३०० मी आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला हा किल्ला कुंडलिका नदीच्या (खाडीच्या) संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
मेढा गावातून येणारी वाट बुरुजाखालून पूर्व दिशेच्या प्रवेशव्दारातून गडावर जाते. या वाटेवर एक युध्दशिल्प(वीरगळ) आहे .पूर्वाभिमुख प्रवेशव्दाराच्या जवळ एका दगडावर शरभाचे शिल्प कोरलेले आहे. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. तरी तेथील स्थानिक गिरीप्रेमी व गड संवर्धक यांच्या साहाय्याने शिवशंभू प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून किल्ल्याची दुरुस्ती मोहीम राबवून होत असते. गडावर एक शिवकालापासून कोरलेला शिलालेख आहे. गडावर असलेला व्दादशकोनी तलाव पाण्याने भरलेला आहे. या तलावाजवळ महादेवाचे मंदिर आहे. या तलावाच्या पश्चिमेला खालच्या बाजूस ७ टाक्याचा एक समूह आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांजवळच पिंगळाई देवीचे/ महिषासुरमर्दिनीचे छोटेसे मंदिर आणि एक दिपमाळ आहे. टाक्यांच्या भिंतीवर एक घुमटी व वीराचे दगडावर कोरलेले शिल्प आहे. बालेकिल्ल्याच्या टोकाला टेहळ्णी बुरुज आहे.बुरुजावर चढण्यासाठी पायर्या आहेत. बुरुजावरुन नागोठणे खिंड, बिरवाडी किल्ला, कुंडलिका नदीचे खोरे इत्यादी परिसर न्याहाळता येतो. गडाच्या उत्तरेकडील टोकावर एक बुरुज आहे. याशिवाय गडावर तोफा, वाड्यांचे चौथरे, सदर इत्यादी गोष्टी पाहाता येतात. पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. ह्या सर्व गोष्टी बघितल्यावर मी निघायला सुरुवात केली उतरताना माझा मार्ग चुकला आणि अंदाजे अर्धा तास मी जंगलातच भटकत होतो काय करावे सुचेनासे झालेले मोबाईल ला नेटवर्क सुध्दा नव्हता. मनात शंका आली कुठचा प्राणी वैगरे पटकन अंगावर आला तर काय होणार आपलं पण थोडं धीर धरून सकारात्मक राहू लागलो आणि छत्रपती शिवारायांची आठवण सारखी मनात आणू लागलो आणि थोडया काही वेळातच मार्ग सापडला आणि जीवात जीव आला जरा. लगेचच खाली उतरल्यावर मागे वळून पाहिलं महाराजांना नमस्कार केला.. पण तेव्हाच्या ह्या घडलेल्या प्रकारामुळे परत एकट्याने ट्रेकला जायची माझी काय इच्छा झाली नाही. ह्यातून सुखरूप बाहेर पडलो हेच खुप मोठं होतं. काही वेळातच रोहा मार्गे पनवेल-पेण गाठून मुंबईला आलो.
ह्या गिर्यारोहाणावरून एक मात्र लक्षात आले.. की एक अनुभव म्हणून एखाद वेळेला ठीक आहे पण केव्हा कुठची वेळ कशी येईल हे सांगता येत नाही.. म्हणून मी गिर्यारोहणाला आत्ता कधीच एकटा नाही जात. कारण जीव आपला व्यवस्थित असेल तरच आपण निसर्गाच्या सानिध्यात राहू शकतो व गिरीभ्रमंती करू शकतो. आयुष्यात गिरीभ्रमंती तसेच निसर्गाचा आस्वाद हा हवाच त्याशिवाय मनाला स्थिरता नाही येऊ शकत हे मात्र अगदी खरे.
पोहोचण्याच्या वाटा :
१) मेढा मार्गे :-
मुंबई - रोहा मार्गावर रोह्याच्या अगोदर ७.५ किमी अंतरावर असलेल्या मेढा या गावी उतरावे. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने आपण एका तासात गडावर पोहोचतो. वाट दाट झाडांमधून जात असल्याने वाट चुकण्याची शक्यता आहे. या वाटेने आपण पडक्या बुरुजावरून गडावर पोहोचतो. बुरुजावरून डाव्या बाजूला कुंडलिका नदीच्या खोर्यातील मेढा व पिंगळसई ही गावे दिसतात.
२) पिंगळसई मार्गे :-
अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी अथवा पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंगळसई गावात आपण पोहोचतो. हे अंतर साधारणपणे ५ किमी आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते. या वाटेवर एक युध्दशिल्प(वीरगळ) आहे.
३) पडम मार्गे :-
गडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गे पिंगळसई गावाला येतांना, रोहा-नागोठणे मार्गावर एक बंद पडलेला कागद कारखाना आहे. या कारखान्याच्या मागून जाणारी वाट गडाच्या दक्षिण प्रवेशद्वरापाशी घेवून जाते. या वाटेने गडावर जाण्यास दोन तास पुरतात.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर बारमही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पिंगळसई मार्गे १ तास, तर पडम मार्गे २ तास लागतात.
--/ चंद्रशेखर सावंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा